मुंबई : नाना पाटेकर आणि तनुश्री दत्ता यांच्यातील वाद मिटण्याची चिन्हं काही दिसत नाहीत. या प्रकरणावरून बॉलीवुडमध्ये आता दोन गट पाहायला मिळत आहेत. तनुश्रीच्या बाजूने बोलणारे तर काही नाना पाटेकरांच्या बाजूने प्रतिक्रिया देत आहेत. नाना आणि तनुश्री दोघांनीही एकमेकांवर कायदेशीर कारवाई करण्याची सुरूवात केली आहे. दरम्यान यावर आता दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
'मी टू' अभियान हे वाईटाविरुद्ध खऱ्याचा विजय असे आहे. हे अभियान स्त्री विरुद्ध पुरूष असं नाही बनलं पाहिजे. शोषण हे स्त्रीचं असो वा पुरूषाचं दोन्हीही चुकीचंच असं मत रणवीर सिंहने मांडलं. नाना आणि तनुश्री वादावर दीपिकाला प्रश्न विचारण्यात आला. 'माझ्यासाठी मी टू हे अभियान लिंगाशी संबंधित नाही तर वाईटवार सत्याचा विजय असे असल्याचे ती म्हणाली. भेदभाव आणि शोषण होणाऱ्या प्रत्येक व्यक्तिची आपण मदत करायला हवी. मग तेव्हा ती स्त्री की पुरूष असा भेदभाव करु नये. याला आणखी कठीण करु नका..यातील भांडणात अडकून राहू नका' असेही दीपिकाने सांगितलं.
शोषण हे केव्हाही चुकीचंच आहे. मग ते सार्वजनिक ठिकाणी असो, रस्त्यावर किंवा घरी असो हे वाईटचं असल्याचे मत रणवीरनं मांडलं.
नाना पाटेकर यांनी तनुश्रीला कायदेशीर नोटीस पाठवतच तिने आपली माफी मागावी अशी विचारणा त्या माध्यमातून केली होती.
यातील पहिली नोटीस ही अभिनेते नाना पाटेकर यांनी तर, दुसरी दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी पाठवल्याचं ती म्हणाली.
अत्याचारांविरोधात आवाज उठवल्याचीच ही शिक्षा आपल्याला मिळत असल्याचं तिचं म्हणणं आहे. भारतात अन्यायाविरोधात बंड पुकारण्यासाठी या सर्व गोष्टी सहन कराव्याच लागतात, असं तिचं म्हणणं आहे.
नाना पाटेकर आणि विवेक अग्निहोत्री यांची एक टीमच सोशल मीडियावर आपली बदनामी करत असल्याचंही ती म्हणाली.
दरम्यान, नानांवर आरोप करणाऱ्या तनुश्रीने आपल्या घरी काही अज्ञातांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्याचं म्हणत काही राजकीय पक्षांकडूनही धमक्या मिळत असल्याचं माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.
देशाच्या न्यायव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या तनुश्रीला आता पुढे नेमकं कोणत्या प्रसंगाचा सामना करावा लागतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.