मुंबई : कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे, असं म्हणत गेली चार वर्षे झी मराठी वाहिनीवरील 'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. प्रेक्षकांचे प्रेम आणि उत्तम प्रतिसादाने 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाने ४०० भागांचा यशस्वी पल्ला गाठला. आता पर्यंतच्या प्रवासात चला हवा येऊ द्या मध्ये प्रेक्षकांनी महाराष्ट्र दौरा, भारत दौरा आणि विश्व दौरा यांचा मनमुराद आनंद लुटला.
४०० भागांनंतर आता या कार्यक्रमात नवीन काय असा प्रश्न सर्वांसमोर उपस्थित झाला असताना नुकतंच चला हवा येऊ द्याचे नवीन पर्व होउ दे व्हायरल प्रेक्षकांच्या भेटीस आले. या पर्वात तुमच्या आमच्या सारख्या सामान्य लोकांनी प्रेक्षकांना हसवण्याचा विडा उचलला आहे. पण आता येणाऱ्या आठवड्यात चला हवा येऊ द्या साजरा करणार आहे नागराज मंजुळे स्पेशल आठवडा.
येत्या भागात थुकरटवाडीत नाळ या झी स्टुडिओजच्या आगामी चित्रपाटाची टीम येणार आहे. या चित्रपटात नागराज मंजुळे स्वतः अभिनय करणार आहेत. ते स्वतः या संपूर्ण टीम सोबत थुकरटवाडीला भेट देणार आहेत. तसेच नागराज मंजुळे यांची सैराट या ब्लॉकबस्टर चित्रपटामुळे ज्या कलाकारांशी नाळ जोडली गेली ते कलाकार देखील चला हवा येऊ द्या च्या मंचावर नागराज मंजुळे यांना शुभेच्छा देण्यासाठी सज्ज झाले.
सैराटमधील परश्या, लंगड्या आणि फॅन्ड्री मधल्या जब्या हे सर्व कलाकार थुकरटवाडीत उपस्थित होते. चला हवा येऊ द्या च्या विनोदवीरांनी या ऐन मोक्यावर इंडस्ट्रीतील कलाकार नागराज मंजुळे यांना शुभेच्छा द्यायला आले तर ते कशाप्रकारे शुभेच्छा देतील यावर एक धमाल विनोदी स्किट सादर केलं. त्यात कुशल आणि सागर अजय अतुल, तर भाऊ कदम आर्ची, अंकुश वाढवे सिनिअर सोनाली कुलकर्णी, भारत गणेशपुरे महेश कोठारे बनले.
हे सर्व विनोदवीर त्यांच्या अभिनय कौशल्याने आणि कॉमेडी टायमिंगने सर्व रसिक प्रेक्षकांना हसून लोटपोट करण्यासाठी संपूर्ण आठवडा सज्ज होणार आहेत. त्यामुळे ही सर्व धमाल पाहायला विसरू नका १२ आणि १६ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३० वाजता फक्त आपल्या झी मराठीवर!!!