हिंदू दिलीप धर्मांतर करत जेव्हा A.R. Rahman होतो...

एका घटनेनं आयुष्याला कलाटणी

Updated: Jan 6, 2022, 12:52 PM IST
हिंदू दिलीप धर्मांतर करत जेव्हा A.R. Rahman होतो...  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : जागतिक पातळीवर ख्ताती मिळवणाऱ्या आणि थेट ऑस्कर पुरस्कारापर्यंत मजल मारणाऱ्या संगीतकार ए.आर. रेहमान यानं देशाचं नाव मोठं केलं आहे. रेहमानची गाणी म्हणजे जणू मनावर हळूच मारलेली फुंकर. त्याला अवगत असणाऱ्या या कलेचा अनेकांनाच हेवा वाटतो. (A.R. Rahman )
 
संगीत क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या अनेकांसाठी आदर्शस्थानी असणाऱ्या याच रेहमानला संगीताचा वारसा हा त्याच्या वडिलांकडून मिळाला आहे. 

वयाच्या अवघ्या 9 व्या वर्षी त्याच्या वडिलांचं निधन झालं होतं. त्यावेळी परिस्थिती इतकी हलाखीची होती की, त्यांना वडिलांची वाद्य विकण्यापासून ते अगदी शिक्षण सोडण्यापर्यंतचे निर्णयही घ्यावे लागले. 

एक वेळ अशीही आली, जेव्हा पंचवीशीच्या वयात रेहमानच्या मनात आत्महत्येचेही विचार आले होते. एका मुलाखतीत त्यानं याबाबतचा खुलासा केला होता. 

संगीत ही एकमेव अशी गोष्ट होती, ज्यामुळं तो जीवनात पुन्हा खंबीरपणे उभा राहू शकला. 

1991 मध्ये त्यानं चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शनाचं काम सुरु केलं. मणी रत्नम यांनी त्याला 'रोजा'चं संगीत देण्याची संधी दिली. 

का केलं धर्मांतर ? 
असं म्हटलं जातं की, 1984 मध्ये रेहमानची बहीण फारच आजारी होती. त्याचवेळी त्याची ओळख एका कादरीशी झाली. त्यांची सेवा केल्यानंतर त्याची बहीण पूर्णपणे बरी झाली. 

कादरींवरील याच विश्वासापोटी त्यानं कुटुंबासह इस्लाम धर्माचा स्वीकार केला. ज्यानंतर त्याची ओळख दिलीप कुमारहून अल्लाह रखा रेहमान अशी झाली.