माझ्या नवऱ्याची बायको : शनायाचं कोर्टात येणं गुरूला पडणार का भारी?

मुंबई : राधिकाने घटस्फोट घेण्याचा निर्णय  घेतला आणि माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेला वेगळंच वळण मिळालं आहे. राधिका आणि गुरूनाथ आता कोर्टात न्याय मागण्यासाठी गेले आहेत आणि अशावेळी शनाया कोर्टात येऊन सर्वांनाच आश्चर्यचकित करते. शनायाचं अस अचानक कोर्टात येणं गुरूला महागात पडणार असलं तरीही ही गोष्ट राधिकासाठी मात्र जमेची बाजू असणार आहे. 

राधिकासोबत तिचे सासू - सासरे आणि रेवती आहे. त्यांना देखील गुरूनाथने आणि वकिलांनी केलेले आरोप अतिशय धक्कादायक आहेत. गुरूनाथचे वकिल तर राधिका मनोरूग्ण ठरवून हे प्रकरण न्यायाधीशांच्या समोर मांडत आहेत. शनायाने गुरूनाथच्या क्रेडिट कार्डवरून केलेली खरेदी हा देखील एक ठोस पुरावा राधिकाकडे आहे. आता याच सगळ्याच माध्यमातून ती खोटारड्या गुरूनाथकडून घटस्फोट घेते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.