'अग्गंबाई...', लग्नबंधनात अडकल्या 'सासूबाई....'

पाहा अभिजीत- आसावरीच्या लग्नसोहळ्यातील काही क्षण 

Updated: Jan 14, 2020, 08:14 PM IST
'अग्गंबाई...', लग्नबंधनात अडकल्या 'सासूबाई....'  title=
अग्गंबाई सासूबाई

मुंबई : प्रेमाला कोणतीही परिसीमा किंवा मोजक्या शब्दाची व्याख्या नसते. त्याचप्रमाणे प्रेमाला वयाची मर्यादा किंवा समाजाची बंधनंही नसतात. असली, तरीही साथीदाराचा विश्वास आणि आपल्या माणसांची साथ या संघर्षालाही काहीशी सुकर करुन जाते. याचीच प्रचिती देणारी एक मालिका काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आली. ती मालिका म्हणजे 'अग्गंबाई सासूबाई'. 

निवेदिता सराफ, गिरिश ओक, तेजश्री प्रधान, रवी पटवर्धन, आशुतोष पत्की यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या या मालिकेमध्ये आता अता एक अतिशय रंजक वळण येणार आहे. पतीच्या निधनानंतर कुटुंब आणि फक्त कुटुंबापुरतंच आपलं विश्व सीमीत ठेवणाऱ्या 'आसावरी'च्या जीवनात 'अभिजीत राजें'च्या रुपात पुन्हा एकदा नवे रंग येतात. हे रंग म्हणजे विश्वासाचे, प्रेमाचे आणि नि:स्वार्थ भावनांचे... अशा या भावनिक आणि तितक्यात नाजुक नात्याला अलगदपणे आकार देण्यास आसावरी आणि अभिजीतला साथ मिळाली ती म्हणते तेजश्री प्रधान हिने साकारलेल्या 'शुभ्रा' या पात्राची. 

कथानकाची हीच रंजकता जपत आता मालिका अभिजीत आणि आसावरीच्या लग्नापर्यंत येऊन पोहोचली आहे. नुकतंच या मालिकेमध्ये आजोबाही त्यांचं मत बदलून या लग्नासाठी तयार झाल्याचं पाहायला मिळत आहे. तेव्हा आता पुढची पायरी म्हणजे अभिजीत राजे आणि आसावरीचं लग्न. अशा या अतिशय सुरेख सोहळ्याचा एक व्हिडिओ 'झी २४तास'ने प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. 

लग्नसोहळ्यातील काही खास क्षणांच्या या व्हिडिओमध्ये अभिजीत आणि आसावरी लग्नाच्या विधींमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे. आपल्या जीवनातील या अविस्मरणीय प्रसंगाच्या वेळी भावनांचा काहूर माजल्यामुळे 'आसावरी'च्या चेहऱ्यावर त्या भावना लगेचच पाहायला मिळत आहेत. तर, 'ये इश्क नहीं आसां , इतना तो समझ लीजिये एक आग का दरिया है , और डूब के जाना है', अशाच काहीशा प्रसंगांना सामोरं जात अखेर आसावरीची साथ लाभल्याचा आनंद अभिजीत राजेंच्या चेहऱ्यावर दिसत आहे. ही दोन्ही पात्र साकारणाऱ्या निवेदिता सराफ आणि गिरिश ओक या कलाकारांचं सध्या प्रेक्षकांकडून प्रचंड कौतुक करण्यात येत आहे. शिवाय आता या पुढे 'सासूबाईं'चा प्रवास कसा असणार याविषयीसुद्धा कुतूहल व्यक्त केलं जात आहे.