'दुर्लक्ष की कामचुकारपणा?' परिसरातील ‘तो’ प्रकार पाहून मराठी अभिनेत्रीचा संताप, म्हणाली 'कचरा जाळताना...'

मराठी कलाकार हे सामाजिक विषयांसंबंधित अनेक विषयांवर मनमोकळेपणाने भाष्य करताना दिसतात. आता एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि लेखिकेने परिसरातील कचरा आणि त्यामुळे होणारे प्रदूषण याबद्दल पोस्ट शेअर केली आहे.

Updated: Feb 17, 2024, 05:19 PM IST
'दुर्लक्ष की कामचुकारपणा?' परिसरातील ‘तो’ प्रकार पाहून मराठी अभिनेत्रीचा संताप, म्हणाली 'कचरा जाळताना...' title=

Mugdha Godbole Pollution Post : गेल्या काही काळापासून अनेक मराठी कलाकार हे सोशल मीडियावर विविध विषयांवर आपली मतं मांडताना दिसतात. मराठी कलाकार हे सामाजिक विषयांसंबंधित अनेक विषयांवर मनमोकळेपणाने भाष्य करताना दिसतात. आता एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि लेखिकेने परिसरातील कचरा आणि त्यामुळे होणारे प्रदूषण याबद्दल पोस्ट शेअर केली आहे. यामुळे ती चर्चेत आली आहे. 

प्रसिद्ध अभिनेत्री-लेखिका मुग्धा गोडबोले या सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. त्या अनेकदा फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतात. मुग्धा गोडबोले यांनी ‘आई कुठे काय करते’, ‘अजूनही बरसात आहे’, ‘ठिपक्यांची रांगोळी’, ‘श्रीमंत घरची सून’ अशा गाजलेल्या मालिकांचे लेखन केले आहे. आता त्यांनी एक फेसबुक पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. यात त्यांनी कचरा आणि परिसरातील दुर्गंधी याबद्दल भाष्य केले आहे. 

मुग्धा गोडबोलेची संतप्त पोस्ट

“रोज सकाळी आमच्या आजूबाजूला कचरा जाळतात. कित्येक तास तो धूर नाकात, घशात जाणवत राहतो. अनेक सोसायट्याच कचरा उचलणाऱ्या माणसांना ‘इथेच जाळून टाका ‘ असं सांगतात म्हणे. म्हणजे आता याबद्दलही तक्रार करणं आलं. पण हा काय आळस आहे? का दुर्लक्ष, का कामचुकारपणा? आणि असला तर कुणाचा?” असा संतप्त सवाल मुग्धा गोडबोले यांनी केला आहे. 

कचरा जाळतानाचा व्हिडीओ

त्यांनी याबद्दलचा एक व्हिडीओही पोस्ट केला आहे. या व्हिडीओत काही कर्मचारी हे कचरा जाळताना दिसत आहेत. त्यांनी या व्हिडीओला हटके कॅप्शन दिले आहे. “याचविषयी काल लिहिलं होतं. मी या लोकांना पोलिसांत तक्रार करेन असं म्हणाले आहे… यावर यांचं म्हणणं आहे की, पालापाचोळा उचलायला एवढ्या आत गाडी येत नाही. आम्हाला पायी चालत लांबवर हे न्यावं लागतं. यावर काय उपाय असतो? या बायकांची दयाही येते. पण त्या जे करतायत तेही चुकीचं आहे.” असे मुग्धा गोडबोले यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, मुग्धा गोडबोले यांच्या या पोस्टवर अनेक नेटकरी कमेंट करताना दिसत आहेत. यावर एका नेटकऱ्याने पालापाचोळा उचलायला गाडी येत नाही हे खरे आहे. यावर उपाय काय हा प्रश्नच आहे. क्षेत्रीय कार्यालयात अनेक वेळा तक्रार करूनही काहीही घडलेले नाही. पण तुम्ही ट्राय करून पहा, अशी कमेंट एकाने केली आहे. तर एकाने “महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करा” असा सल्ला तिला दिला आहे.