Tejaswini Pandit New Movie : मराठी चित्रपटसृष्टीमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून अभिनेत्री तेजस्विनी पंडितला ओळखले जाते. तिने आतापर्यंत अनेक दर्जेदार चित्रपटांमध्ये काम केले आहे. तेजस्विनी ही चित्रपट, मालिका यांसह ‘समांतर’ आणि ‘रानबाजार’ या दोन सुपरहिट वेबसीरिजमध्येही झळकली. ‘अगं बाई अरेच्चा’ चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीमध्ये पदार्पण करणारी तेजस्विनीने काही महिन्यांपूर्वी निर्माती क्षेत्रात पदार्पण केले. आता महिला दिनानिमित्ताने तेजस्विनीने तिच्या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे.
तेजस्विनी पंडित ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. तेजस्विनीने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्या नवीन चित्रपटाबद्दल घोषणा केली आहे. 'येक नंबर' असे या चित्रपटाचे नाव आहे. तेजस्विनीचा निर्माती म्हणून हा दुसरा चित्रपट आहे. याला कॅप्शन देताना तेजस्विनीने या चित्रपटाबद्दलची माहिती दिली आहे.
"मित्र-मैत्रिणींनो, आज जागतिक महिला दिनानिमित्त मी आणि माझी सशक्त मैत्रीण, सहकारी निर्माती वर्धा नाडियाडवालाच्या साथीने आजपासून “येक नंबर” कारभार जमवलाय, निर्माती म्हणून आणखी एक मोठी उडी घेतलीये, नेहमीप्रमाणे तुमचे आशिर्वाद आणि प्रेम असू दे ! ह्या आमच्या प्रवासात आम्हाला भक्कम तंत्रज्ञ लाभले आहेत. दिग्दर्शक राजेश मापुस्कर, छायाचित्रकार संजय मेमाने आणि संगीत अजय-अतुल. आमच्या ह्या “येक नंबर” परिवाराला तुमच्या शुभेच्छांची गरज आहे ! आजपासून “येक नंबर“ च्या चित्रीकरणास सुरुवात, गणपती बाप्पा मोरया आणि महाशिवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा", असे कॅप्शन तेजस्विनीने या पोस्टला दिले आहे.
'येक नंबर' अशी प्रेमकथा आहे, जी राजकीय पार्श्वभूमीवर आधारित असणार आहे. हा चित्रपट नातेसंबंधांच्या गुंतागुंतीवर भाष्य करणार आहे. आजपासून या चित्रपटाच्या शूटींगला सुरुवात होणार आहे. महाराष्ट्रातील वाई, जुन्नर, मुंबई आणि कोकण यांसारख्या नयनरम्य ठिकाणी तब्बल 52 दिवस या चित्रपटाचे चित्रीकरण होणार आहे. या चित्रपटात कोण कलाकार असणार याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
वर्धा नाडियाडवाला यांच्या जोफिएल एंटरप्राईज आणि तेजस्विनी पंडित यांच्या सह्याद्री फिल्म्स निर्मित, नाडियाडवाला ग्रॅण्डसन एंटरटेनमेंट प्रस्तुत 'येक नंबर' या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. 'व्हेंटिलेटर', 'फेरारी की सवारी' सारखे सुपरहिट चित्रपट देणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते राजेश मापुस्कर या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. तर छायाचित्रणाची धुरा संजय मेमाणे यांनी सांभाळली आहे. संगीतप्रेमींना भुरळ घालणाऱ्या अजय-अतुल या प्रशंसनीय जोडीचे संगीत या कथानकात अधिकच भर टाकणार आहे.