'मुंबई सर्वात वाईट शहर...'; प्रसिद्ध मराठी अभिनेत्री असं का म्हणाली?

गेल्या काही दिवसांपासून मायानगरी असलेल्या मुंबईत प्रदूषणाची वाढ होत आहे गंभीर बाब म्हणजे मुंबईच्या हवेचा दर्जाही ढासळू लागला आहे. आता याच मुद्द्यावर एका मराठमोळ्या अभिनेत्रीने संतप्त पोस्ट शेअर केली आहे. 

Updated: Jan 11, 2024, 09:52 PM IST
'मुंबई सर्वात वाईट शहर...'; प्रसिद्ध मराठी अभिनेत्री असं का म्हणाली? title=

Manva Naik Mumbai Pollution : गेल्या काही दिवसांपासून मायानगरी असलेल्या मुंबईत प्रदूषणाची वाढ होत आहे. सध्या मुंबईत सुरु असलेली विविध बांधकामं, माणसांची वाढणारी गर्दी आणि त्यात वाहनांचे हॉर्नचा आवाज यामुळे प्रदूषण वाढताना दिसत आहे. याबरोबर गंभीर बाब म्हणजे मुंबईच्या हवेचा दर्जाही ढासळू लागला आहे. आता याच मुद्द्यावर एका मराठमोळ्या अभिनेत्रीने संतप्त पोस्ट शेअर केली आहे. 

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत प्रदूषणाच्या समस्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहेत. याच पार्श्वभूमीवर मराठी अभिनेत्री मनवा नाईकने संताप व्यक्त केला आहे. मनवा ही सोशल मीडियावर सक्रीय असते. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात मनवाने एका इमारतीच्या बांधकामाचा फोटो पोस्ट केला आहे. 

मनवा नाईकची प्रदूषणाबद्दल पोस्ट

या पोस्टला कॅप्शन देताना तिने मुंबई आणि प्रदूषणाबद्दल तिचे मत व्यक्त केले आहे. "माझ्यासाठी हे पूर्णपणे निराशाजनक आहे. कारण वायू प्रदूषण, रस्ते, ठिकठिकाणी सुरु असलेले बांधकाम, ट्राफिक आणि सौंदर्यशास्त्र या दृष्टीने मुंबई हे सर्वात वाईट शहर आहे. सध्या मुंबईत धुळीने माखलेल्या इमारतींचे कुरूप ब्लॉक्स वाढतच चालले आहेत. त्याबरोबरच नवीन पायाभूत सुविधांच्या नावाखाली वर्षानुवर्षे खोदकाम केले जाते. बँडस्टँड, हाजी अली ही ठिकाणे आता पूर्वीसारखी राहिलेली नाहीत. यानंतर आता रेस कोर्सचाही नंबर आहे. त्यामुळे हे सगळं पाहून मन दुखावत आहे", असे मनवा नाईक यावेळी म्हणाली. याबरोबरच तिने "या पोस्टचा राजकारणाशी काहीही संबंध नाही", असेही नमूद केले आहे.

मनवा नाईकची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. या पोस्टवर अनेक चाहते कमेंट करताना दिसत आहेत. "मुंबईच नव्हे तर कोकणात सुद्धा ही परिस्थिती आहे. चिपळूण, रत्नागिरी मध्ये प्रचंड प्रदूषण आणि धूळ आहे. ज्या मुंबई गोवा हायवे च्या नावाखाली निसर्गाचं वाटोळं झालं तो तर काही इतक्या वर्षात झाला नाहीच पण कोकणची वाट लागली", अशी कमेंट एकाने केली आहे. तर एकाने "पुण्यात पण अशीच स्थिती आहे. आमचा बंगला मेन रोड वर असल्याने प्रदूषण, धुळीचा त्रास जाणवतो. दुचाकी संख्या इतकी प्रचंड वाढली आहे... एकंदरीत कठीण आहे", असे म्हटले आहे. 

दरम्यान मनवा नाईक ही अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि निर्माती अशा सर्वच क्षेत्रात कार्यरत आहे. तिने आतापर्यंत अनेक चित्रपटात काम केले आहे. काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेला अभिनेते डॉ. अमोल कोल्हेंच्या ‘शिवप्रताप गरुडझेप’ या चित्रपटातही मनवा झळकली होती. यात तिने छत्रपती शिवाजी महाराज यांची पत्नीची सोयराबाई मोहिते ही भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेचे प्रचंड कौतुक पाहायला मिळाले होते.