मुंबई : रस्त्यांवरी खड्डे आणि त्या खड्ड्यांमध्ये जाणारा सर्वसामान्यांचा जीव हे मुद्दे आता प्रकर्षाने मांडले जाऊ लागले आहेत. याविषयी मराठी कलाविश्वातील कलाकार मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबई, उपनगर आणि परिसरातील रस्त्यांवरही खड्ड्यांचं वाढतं प्रमाण, मुळात रस्त्यांची झालेली चाळण पाहता हे सारंकाही कुठेतरी थांबायला हवं आणि प्रशासनाने याची दखल घेतली पाहिजे या अनुशंगाने मराठी अभिनेता सुबोध भावे, जितेंद्र जोशी, प्रशांत दामले आणि ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांनी आवाज उठवला आहे.
सर्व भारतीयांना समर्पित असं लिहित जितेंद्र जोशीने एक उपरोधिक पोस्ट लिहित त्या माध्यमातून दाहक वास्तव सर्वांसमक्ष आणलं आहे. हे जग म्हणजे एक खड्डा आहे, जो भरण्यासाठी कर भरावा लागेल. ज्यासाठी माणसाला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागेल, असं त्याने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिलं. त्याने लिहिलेल्या या पोस्टमधून नाराजीचा तीव्र सूर आळवल्याचं पाहायला मिळालं.
जितेंद्रने ही पोस्ट लिहित त्यासोबत खड्ड्यांचे काही फोटोही पोस्ट केले. जे पाहता आयुष्याच्या या वळणवाटांवर आव्हानांच्या संघर्षासोबतच आता या खड्ड्यांचीही आडकाठी येत असल्याचं चित्र समोर येत आहे.
सर्व भारतीयांना समर्पित pic.twitter.com/AYeq21sLpg
— Jitendra Joshi (@jitendrajoshi27) September 16, 2019
अभिनेता सुबोध भावे यानेही खड्ड्यांना छुपे दहशतवादी असं म्हणत आपल्या भावाचा आणि एका डॉक्टर मित्राचा या साऱ्या चक्रात जीव गमावल्याचं दु:ख व्यक्त केलं. शिवाय त्याने सर्वांनाच वाहतुकीचे नियम पाळण्याचं आवाहनही केलं. तर इथे आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवणाऱ्या प्रशांत दामले यांनी एक पोस्ट लिहित कल्याणमधील चाळण झालेल्या रस्स्तांविषयी संताप व्यक्त केला.
कल्याणमधील नाट्यरसिक उत्तम असल्याचं म्हणत येथील रस्ते मात्र थर्ड क्लास असल्याचं दामले म्हणाले. त्यांच्या या पोस्टवर अनेकांनीच प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एकंदरच सर्वसामान्यांच्या वतीने आणि समाजातील एक घ़टक म्हणून सेलिब्रिटींची ही आक्रमक भूमिका पाहता स्थानिक आणि इतर सर्वत स्तरांतील जबाबदार मंडळी या विषयाची दखल केव्हा घेणार हे पाहणं अतिव महत्त्वाचं ठरणार आहे.