मुंबई : भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये यंदाच्या क्रिकेट विश्वचषकाचा उपांत्य सामना रंगणार म्हटल्यावर दोन्ही संघांच्या समर्थकांनी आपल्या परीने संघांना पाठिंबा देण्यास सुरुवात केली. सध्याच्या घडीला सातासमुद्रापार सुरु असणाऱ्या या सामन्यांचा अनुभव घेण्यासाठी म्हणून भारतातून बरेच चाहते आणि सेलिब्रिटीसुद्धा मॅचेस्टरला दाखल झाले आहेत. यामधीलच एक चेहरा आहे तो म्हणजे मराठमोळा अभिनेता सचिन खेडेकरचा.
भारताच्या संघाला पाठिंबा देण्यासाठी आणि क्रिकेटच्या खेळाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी म्हणून सचिन खेडेकर त्याच्या मित्रांसह परदेशात पोहोचला आहे. झी २४ तासचे विशेष प्रतिनीधी सुनंदन लेले यांच्याशी सचिनने मँचेस्टरमध्ये संवाद साधत सामन्यासाठीची त्याची उत्सुकता व्यक्त केली. यावेळी त्याने काही जुन्या आठवणींना उजाळाही दिला.
मुंबईच्याच विजय येवलेकर या मित्रासह सचिन क्रिकेटच्या आठवणींना उजाळा देताना दिसत आहे. उपांत्य सामने आणि अंतिम सामन्याची रंगत पाहण्यासाठी सचिन परदेशात असणार आहे.
भारतीय संघाची सध्याची एकंदर कामगिरी पाहता उपांत्य सामना हा अटीतटीचा व्हावा अशी इच्छा सचिनने व्यक्त केली. शिवाय हा संघ विश्वचषक विजयाच्याच दिशेने एक एक पाऊल उचलत असल्याची प्रतिक्रियाही त्याने दिली. एकंदरच अभिनयातील या सचिनने क्रिकेटच्या सामन्यांप्रतीची त्याची उत्सुकता व्यक्त केली. यामध्ये त्याने रोहित शर्माच्या फलंदाजीची आणि एकंदर सध्य़ाच्या फॉर्मचीही प्रशंसा केली. तेव्हा आता प्रचंड आत्मविश्वास आणि अपेक्षा बाळगून गेलेल्या सचिनची आणि असंख्य चाहत्यांची साद ऐकत विराट सेना नेमकी कशी कामगिरी करणार हे पाहणं अतिशय उत्कंठा वाढवणारं ठरणार आहे.