Milind Gawali Appeal For Voting : लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यासाठीचे मतदान नुकतंच पार पडले. यात रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या महाराष्ट्रातील पाच मतदारसंघाचा समावेश होता. आता सध्या अनेक मराठी कलाकार हे चाहत्यांना मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. याच पार्श्वभूमीवर अभिनेते मिलिंद गवळी यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी त्यांनी मला वाटतं मतदान करणं कंपल्सरी करायला हवं, असे मत व्यक्त केले आहे.
विविध नाटक, मालिका आणि चित्रपटांतून प्रसिद्धीझोतात आलेले अभिनेते म्हणून मिलिंद गवळींना ओळखले जाते. ते कायमच त्यांच्या पोस्टमुळे चर्चेत असतात. सध्या ते आई कुठे काय करते या मालिकेत झळकत आहे. या मालिकेत ते अनिरुद्ध देशमुख हे पात्र साकारताना दिसतात. मिलिंद गवळींनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ते तिरंगा ध्वज फडकवताना दिसत आहेत. तसेच त्यांनी मालिकेतील काही फोटो आणि व्हिडीओ एकत्र करत चाहत्यांना आवाहन केले आहे.
"जगात सर्वात मोठी लोकशाही भारत आहे, पण मतदानाचा अधिकार खूप कमी लोक वापरतात. मतदान करण्यासाठी बऱ्याच लोकांना सुट्टी दिली जाते, पण तरीसुद्धा ते मतदान करत नाहीत. आपल्या मतदारसंघात नको तो उमेदवार आहे !, आपला उमेदवार निवडून येणारच आहे , मग आपण कशाला मतदान करा !, सगळेच उमेदवार भ्रष्ट असतात ! म्हणून आपण मतदान करायचं नाही, एक न अनेक कारणे दिली जातात, सुट्टी असल्याने आपल्या फॅमिली बरोबर किंवा मित्रमंडळींबरोबर बाहेर कुठेतरी निघून जातात, मग ३५% ५५% टक्के मतदान होतं आणि एखादा उमेदवार निवडून येतो मग पाच वर्षे त्याच्या नावाने बोंबा मारत बसतात,
मला वाटतं मतदान करणं कंपल्सरी करायला हवं, कमीत कमी 90 - 95 टक्के मतदान व्हायलाच हवा, पण मग त्यासाठी जसा काळ बदललाय, तसं मतदान करण्याची पद्धत ही बदलायला हवी, घरबसल्या आपण अनेक पैशांचे व्यवहार करतो, रेल्वे बसचे तिकिटांचा आरक्षण करतो, विमानाचे तिकिटाचा आरक्षण करतो, यासाठी रांगेत उभे राहावे लागत नाही, वेळ वाचतो, त्या साठी सुट्टी घ्यायची गरज लागत नाही, आपण दहा बिल घरबसल्या भरू शकतो, मतदान का नाही करू शकत?,
तो जर भारतीय नागरिक असेल तर जगाच्या कुठल्याही टोकात बसून त्याला मतदान करायचा अधिकार मिळाला हवा, कुठल्याही भारताच्या राज्यातून मतदान करता यायला हवं, प्रवास करून त्या त्या भागात जायची गरज नाहीये, आजरी माणसांना हॉस्पिटलमध्यून पण मतदान करायला यायला हवं, म्हातारी माणसं, अपंग यांना त्यांचा मतदानाचा अधिकार सोप्या पद्धतीने करायला मिळायला हवा,
मतदान करणाऱ्याला सवलती मिळायला हव्या, न करणाऱ्याला दंड नाही पण एखाद्या सवलतीतून त्याला वगळ्यायला हवं, टॅक्स म्हणा टोल म्हणा, शाळा कॉलेजेस ऍडमिशन, काहीही ज्याच्याने मतदान करणारा किंवा मतदान न करणारा यामध्ये फरक जाणवला पाहिजे, पण हे सगळं व्हायला थोडा वेळ लागणार आहे, भविष्य काळामध्ये हे सगळं होणारच आहे . पण तूर्तास, पूर्वी आपण जसे रेल्वे स्थानकावर, विज बिल भरायला, किंवा एखाद्या बँकेत रांगेत उभे रायचो , थोडा त्रास थोडी धावपळ सहन करायचो, तसा थोडा त्रास आपल्या देशासाठी करायला काहीच हरकत नाही, चला मतदान करूया, योग्य माणसांच्या हातात देशाला सोपवूया , मतदान करणं ही आपली जबाबदारी आहे, ती प्रामाणिकपणे पार पाडूयात", असे आवाहन मिलिंद गवळींनी केले आहे.
मिलिंद गवळींच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी 'खूपच उत्तम विचार' असे म्हटले आहे. तर एकाने 'सुंदर विचार' अशी कमेंट केली आहे. सध्या मिलिंद गवळीची ही पोस्ट व्हायरल होत आहे.