मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ट्रोलिंगचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. सतत होत असलेल्या ट्रोलिंगचा सामना कलाकारांना करावा लागत आहे. ही गोष्ट आता ट्रोलिंग पर्यंत मर्यादीत राहिली नसून सेलिब्रिटींना जीवे मारण्याच्या आणि बलात्काराच्या देखील धमक्या येत आहेत. त्यामुळे अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने या विरोधात एक मोहीम सुरू केली आहे. ‘अब बस..’ असं या मोहिमेचं नाव आहे.
‘अब बस..’ या मोहिमे अंतर्गत सोनाक्षीने मुंबई पोलिसांत एक एफआयआर दाखल केली आहे. त्यावर कारवाई करत सायबर सायबर क्राईम पथकाने एका आरोपीला अटक केली आहे. सोनाक्षीने एफआयआर दाखल केल्यानंतर पोलिसांनी २७ वर्षीय शशिकांत जाधव नावाच्या तरूणाला औरंगाबादमधून अटक केली आहे. त्यामुळे सोनाक्षी पोलिसांचे आभार मानले आहेत.
सोनाक्षीने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत. 'तात्काळ कारवाई केल्यामुळे मुंबई पोलिसांचे आणि सायबर क्राईम पथकाचे देखील आभार मानते. आता ट्रोलिंग करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येईल. ऑनलाईन धमक्या आणि त्रास देणाऱ्यांची मनमानी वृत्ती मोडीत काढण्याची वेळ आहे. ' असं ती म्हणाली.
सोशल मीडियावरील ट्रोलिंग आणि नकारात्मकतेपासून लांब राहण्यासाठी सोनाक्षीने तिचा ट्विटर अकाऊंट बंद केला. त्यानंतर आता तिने ट्रोलिंगविरोधात मोहिम सुरू करण्याचा निर्धार केला आहे.