राज्य शासनाचा किर्लोस्कर पुरस्कार अभिनेत्री मधुवंती दांडेकर यांना जाहीर

अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्री मधुवंती दांडेकर यांची तर तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ तमाशा कलावंत गुलाबबाई संगमनेरकर यांची निवड झाली आहे.

Updated: Jun 25, 2020, 07:58 AM IST
राज्य शासनाचा किर्लोस्कर पुरस्कार अभिनेत्री मधुवंती दांडेकर यांना जाहीर title=
छाया सौजन्य - twitter @MahaDGIPR

मुंबई : राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्री मधुवंती दांडेकर यांची निवड करण्यात आली आहे. तर तमाशा सम्राज्ञी विठाबाई  नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ तमाशा कलावंत गुलाबबाई संगमनेरकर यांना घोषित करण्यात आला आहे. ५  लाख रुपये, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने त्यांची निवड केली.  

मधुवंती दांडेकर यांची संगीत नाटकांमधली कारकीर्द तब्बल ५५ वर्षांची आहे. आज वयाच्या ७२ व्या वर्षीही त्या या क्षेत्रात कार्यरत आहेत. अभिजात शास्त्रीय व अभिजात मराठी संगीत नाटकांचा वारसा मिळालेल्या मधुवंती दांडेकर यांना गायनाची आवड लहानपणापासून होती. शालेय वयापासूनच त्यांनी गायन व नाट्य स्पर्धांमधून अनेक पारितोषिकं मिळवली होती. स्वरराज छोटा गंधर्व, संगीतभूषण पंडित राम मराठे, पंडित ए.के. अभ्यंकर, पंडित यशवंतबुवा जोशी यांसारख्या ज्येष्ठ व श्रेष्ठ गुरूंकडून त्यांनी शास्त्रीय संगीताचे  शिक्षण घेतले. 

सुमारे २५ मराठी संगीत नाटकांमधून त्यांनी अनेक उत्तमोत्तम भूमिका केल्या.  तसेच गुजराती व उर्दू नाटकांतूनही त्यांनी काम केले. मधुवांतीताईंनी अनेक नामांकित संस्थांच्या नाटकात ज्येष्ठ कलावंतांबरोबर भूमिका केल्या. मधुवंतीताई आजही संगीत व नाट्यक्षेत्रात मोठ्या उत्साहाने व आस्थेने कार्यरत आहेत.

शासनाच्या जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल दांडेकर यांचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी अभिनंदन केले आहे. संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार यापूर्वी  श्रीमती फैय्याज, श्री.प्रसाद सावकार, श्रीमती जयमाला शिलेदार,  अरविंद पिळगावकर,  रामदास कामत कीर्ती शिलेदार,  रजनी जोशी,  चंद्रकांत तथा चंदू डेगवेकर,  निर्मला गोगटे आणि विनायक थोरात यांना प्रदान करण्यात आला आहे.

 जीवनगौरव पुरस्कार गुलाबबाई संगमनेरकर यांना जाहीर

 तमाशा क्षेत्रात प्रदीर्घ सेवा केलेल्या ज्येष्ठ कलाकारास  राज्य शासनातर्फे  तमाशा सम्राज्ञी विठाबाई  नारायणगावकर जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात येते. सन २०१८-१९ साठीचा हा पुरस्कार ज्येष्ठ तमाशा कलावंत गुलाबबाई संगमनेरकर यांना घोषित करण्यात आला आहे. रुपये ५ लाख, मानचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.  

गुलाबबाईंनी वयाच्या अवघ्या नवव्या वर्षापासून लावणी या कलाप्रकारात स्वतःला झोकून दिले. राधाबाई बुधगावकर पार्टी मधून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. बबुताई शिर्डीकर, सुगंधाबाई सिन्नरकर, महादू नगरकर यांच्याकडे शिक्षण घेता-घेता वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी स्वतःची संगीत पार्टी सुरू केली. राज्यातील खेडोपाडी तसेच अनेक प्रतिष्ठित  महोत्सवांमध्ये त्याचबरोबर दूरदर्शनवरून  उत्तम कला  सादर केले आहे. त्यांच्या अनेक ध्वनिमुद्रिका रसिकांनी डोक्यावर घेतल्या. "गाढवाचं लग्न" या अतिशय गाजलेल्या वगनाट्यातही त्यांचा सहभाग होता. शासनाच्या जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल  गुलाबबाई  संगमनेरकर यांचे सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी अभिनंदन केले आहे.