'रात्र वैऱ्याची अन्...', गौरव मोरे लवकरच झळकणार नव्या चित्रपटात, पहिला लूक आला समोर

छोट्या पडद्यावर लोकप्रियता मिळाल्यानंतर आता गौरव हा चित्रपटांकडे वळला आहे. आता त्याने त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. 

Updated: Mar 14, 2024, 10:42 PM IST
'रात्र वैऱ्याची अन्...', गौरव मोरे लवकरच झळकणार नव्या चित्रपटात, पहिला लूक आला समोर title=

Gaurav More Upcoming Movie Poster : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणून गौरव मोरेला ओळखले जाते. 'फिल्टरपाड्याचा बच्चन' म्हणून त्याने सर्वत्र वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या विनोदी शैलीमुळे तो प्रत्येकाला पोट धरुन हसायला लावतो. ‘आय एम ए गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टरपाडा’ गौरवचा हा डायलॉग सर्वत्र लोकप्रिय आहे. छोट्या पडद्यावर लोकप्रियता मिळाल्यानंतर आता गौरव हा चित्रपटांकडे वळला आहे. आता त्याने त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. 

गौरव मोरे हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. तो नेहमी विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट शेअर करताना दिसतो. नुकतंच गौरवने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे तो चर्चेत आला आहे. गौरव मोरेने त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. 'अल्याड पल्याड' असे त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. त्याने या चित्रपटाचे पहिले पोस्टरही शेअर केले आहे. 

गौरव मोरे झळकणार भयपटात

'अल्याड पल्याड' या चित्रपटाच्या पोस्टरवर गौरव मोरे, सक्षम कुलकर्णी, भाग्यम जैन, अनुष्का पिंपुटकर हे कलाकार दिसत आहेत. यात त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड भीती दिसत आहे. यामुळे हा चित्रपट भयपट असल्याचे बोललं जात आहे. रात्र वैऱ्याची, अन् दार उघडं सताड, जीवावर बेतलं की घडतंय अल्याड पल्याड...! असे कॅप्शन गौरवने या पोस्टला दिले आहे. 

कलाकारांनी दिल्या शुभेच्छा

गौरवच्या या पोस्टवर महाराष्ट्राची हास्यजत्रामधील अनेक कलाकारांनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकरने इमोजी शेअर करत त्याच्या पोस्टवर कमेंट केली आहे. तर नम्रता संभेरावने 'अभिनंदन' असे म्हणत त्याच्या पोस्टवर कमेंट केली आहे. तसेच सचिन गोस्वामी यांनी 'अभिनंदन आणि मनःपूर्वक शुभेच्छा!', अशी कमेंट गौरवच्या पोस्टवर केली आहे. 

आणखी वाचा : दिग्दर्शक राम गोपाल वर्मांची राजकारणात एंट्री, 'या' मतदारसंघातून लढणार निवडणूक

दरम्यान 'अल्याड पल्याड' या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रितम एस.के पाटील यांनी केले आहे. तर शैलेश जैन, महेश निंबाळकर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. या चित्रपटात अभिनेता गौरव मोरे, अभिनेता सक्षम कुलकर्णी, अभिनेता भाग्यम जैन, अभिनेत्री अनुष्का पिंपुटकर हे कलाकार झळकणार आहेत. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार, याबद्दल कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.