मुंबई : लता मंगशेकर यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत असली तरी स्थिती चिंताजनक आहे. चार दिवस उलटूनही लता मंगेशकर यांना रूग्णालयातच ठेवले आहे. रविवारी मध्यरात्री 1.30 च्या सुमारास श्वसनाचा त्रास झाल्याने लता मंगेशकर यांना मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल केले आहे.
ब्रीच कँडी रूग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर फारूख उदवाडिया यांच्या देखरेखीखाली औषधोपचार सुरू आहेत. सोमवारी लता दीदींना घरी आणण्यात आल्याची माहिती सोशल मीडियावर होती मात्र ती अफवा असल्याचे समोर आले. गेल्या चार दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
लता दीदींना श्वसनाचा त्रास झाल्यामुळे रूग्णालयात दाखल केलं. त्याचप्रमाणे त्यांना न्युमोनिया देखील झाला आहे. तसेच ह्रदयाचा त्रास देखील वाढला आहे. फुफ्फुसांमध्ये पाणी झालं असल्याचं डॉक्टर सांगत आहेत. श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे वयाच्या 90 व्या वर्षी लता दीदींना रूग्णालयात दाखल केलं आहे. मात्र वय ९० असल्यानं उपचार करण्यावर मर्यादा येत असल्याचे डॉक्टर म्हणाले. मात्र, कुटुंबियांकडून लता दीदींच्या प्रकृतीत सुधारणा असल्याचं सांगितलं जात आहे.
दीदींना रुग्णालात दाखल करण्यात आल्याचं कळताच अनेकांनी त्यांच्या प्रकृतीविषयी काळजी व्यक्त करण्यास सुरुवात केली. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीसुद्धा एक पत्र लिहित दीदींच्या तब्येतीची विचारपूस करणारं एक पत्र लिहिलं आहे. 'तुमच्या प्रकृतीविषयी कळताच मला कालजी वाटली. मी आशा करतो की यात कोणतीच गंभीर बाब नाही. मी आशा करतो की, तुमची प्रकृती लवकरच पूर्वपदावर येईल', असं त्यांनी या पत्रात लिहिलं. महाराष्ट्रात सध्या राजकीय पेच निर्माण झाला असल्यामुले राज्यपालांच्या भूमिकेकडेही यादरम्यान अनेकांचं लक्ष आहे. त्यातच त्यांनी वेळ काढत दीदींची विचारपूस करणारं हे पत्र लिहिलं.