मुंबई : loksabha election 2019 सोशल मीडियाचा वापर चाहते आणि कलाकारांमध्ये असणारी दरी कमी करण्यासाठी केला गेला. मुख्य म्हणते या माध्यमातून कलाकार मंडळींनी फक्त त्यांच्या आयुष्यात चाहत्यांना प्रवेश करण्याची मुभाच दिली नाही तर याच चाहत्यांना काही महत्त्वपूर्ण गोष्टींची जाणही करुन दिली. 'लागिरं झालं जी' या मालिकेतील भूमिकेमुळे प्रकाशझोतात आलेल्या अभिनेता निखिल चव्हाण याने नुकताच पोस्ट केलेला एक व्हिडिओ हेच सिद्ध करत आहे.
'विकी'च्या भूमिकेमुळे प्रकाशझोतात आलेल्या निखिलने आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वांनाच मत करण्याची विनंती केली आहे. टीव्हीचा रिमोट हातात असला की हवी ती मालिका, खेळाचे सामने पाहता येतात, गाणी ऐकता येतात, सिनेमे पाहता येतात, असं अगदी सोपं आणि रोजच्या आयुष्यातील उदाहरण त्याने देऊ केलं आहे. एक कलाकार म्हणून आपण कोणत्याही प्रोजेक्टची स्क्रीप्ट निवडताना प्रचंड विचार करतो, असंही निखिल म्हणताना दिसत आहे. थोडक्यात काय तर अनेक गोष्टींची निवड ही अतिशय विचारपूर्वकपणेच केली जाते.
अनेक गोष्टींसाठी इतका विचार करत असतानाच आपण, पाच वर्षांसाठी आपला प्रतिनिधी कोण असणार याचा विचार का करत नाही, असा अतिशय महत्त्वाचा प्रश्न निखिल या व्हिडिओच्या माध्यमातून उपस्थित करत आहे. अवघ्या काही सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये तो मतदानाता हक्क बजावण्याची विनंती असंख्य प्रेक्षकांना अर्थात, मतदारांना करत आहे. 'मतदान हा फक्त आपला हक्क नाही तर ती आपली ताकद आहे. मतदान करा..!', अशा कॅप्शनसह हा व्हिडिओ त्याने फेसबुकवर पोस्ट केला आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक कलाकार मंडळी चाहत्यांना त्यांचा मतदानाता हक्क वजावण्याची विनंती करत आहेत. एक कलाकार असण्यासोबतच ही मंडळी एक जबाबदार नागरिक असण्याची भूमिकाही अतिशय समर्पकपणे हाताळत आहेत, असं म्हणायला हरकत नाही.