मुंबई : अभिनेता किरण माने यांनी राजकीय भूमिका घेतल्याने त्यांना मालिकेतून तडकाफडकी काढल्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे. त्यांना यामुळे 'मुलगी झाली हो' या मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. ते या मालिकेत विलास पाटीलची भूमिका करत होते.
समाजात घडणाऱ्या गोष्टी आणि राजकीय घडामोडींवर अगदी मोजक्या शब्दात एक पोस्टमध्ये मांडलेलं मत मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालं होतं. एका मुलाखतीमध्ये माने यांनीच या संदर्भात खुलासा करत राजकीय घटनांवर भूमिका मांडल्यामुळे आपल्याला ‘मुलगी झाली हो’ या मालिकेमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचं सांगितलं.
त्यामुळे सगळीकडेच मालिकेच्या निर्मात्यांबाबत संताप व्यक्त केला जात होता. मालिकेनं किरण माने यांना शोमधून तर काढलंच पण त्वरीतच त्यांनी नवीन पोस्टर देखील रिवील केला. त्यामुळे हे प्रकरण आणखीनंच चर्चेत आलं आहे. आता स्टार प्रवाह वाहिनीने एक निवेदन जारी केलं आहे. यामध्ये त्यांनी किरण माने यांनी लावलेले आरोप बिनबुडाचे आणि काल्पनिक असल्यांच म्हटलं आहे आणि त्यांना मालिकेतून बाहेर काढण्याची काही कारणे सांगितली आहेत.
त्यांनी या निवेदनात सांगितलं आहे की, "मुलगी झाली हो" या शोमध्ये विलास पाटील यांची व्यक्तिरेखा साकारणारे अभिनेते श्री किरण माने यांनी लावलेले आरोप बिनबुडाचे आणि काल्पनिक असल्याचे आम्हाला समजले आहे. असे आरोप होणे दुर्दैवी आहे.
पुढे त्यांनी लिहिलं आहे की, प्रॉडक्शन हाऊसने पुष्टी केली आहे की श्री माने यांना शोमधून काढून टाकण्याचा निर्णय शोमधील अनेक सह-कलाकारांसोबत, विशेषतः शोच्या महिला नायिकांशी केलेल्या गैरवर्तनामुळे होता. या मालिकेतील सहकलाकार, दिग्दर्शक आणि शोच्या इतर युनिट सदस्यांनी त्यांच्या सततच्या अनादरपूर्ण आणि आक्षेपार्ह वागणुकीविरुद्ध अनेक तक्रारी केल्या होत्या.
पण किरण माने यांना अनेकदा सांगून ही त्यांनी शोच्या सेटवर मूलभूत शालीनता आणि शिष्टाचाराचा भंग करत त्याच पद्धतीने वागणे सुरू ठेवले. महिलांबद्दलच्या कोणत्याही प्रकारच्या अनादरपूर्ण वर्तनासाठी आमचे शून्य-सहिष्णुतेचे धोरण पाहता, आम्ही किरण माने यांना शोमधून काढून टाकण्याच्या निर्णयाचे समर्थन करतो.
सामग्री उद्योगाचे सदस्य म्हणून, आम्ही सर्व दृश्ये आणि मतांचा आदर करतो आणि स्वतःला भाषण स्वातंत्र्याचे रक्षक समजतो. तथापि, आम्ही आमच्या कलाकारांसाठी, विशेषतः महिलांसाठी सुरक्षित आणि निरोगी वातावरण सुनिश्चित करण्यासाठी तितकेच वचनबद्ध आहोत." असं वाहिनीने म्हटलं आहे. "
आता समोर आलेल्या या निवेदनातील किरण माने यांच्यावरील आरोपमुळे या प्रकरणाला वेगळंच वळण आलं आहे.