मुंबई : गेल्या आठ दिवसांपासून 'स्टार प्रवाह' मालिकेतील कलाकार किरण माने चर्चेत आहेत. किरण माने यांना मालिकेतून तडकाफडकी काढण्यात आलं. यानंतर हा वाद आणखी वाढला. सोशल मीडियावर समिश्र प्रतिक्रिया आहेत. किरण मानेंना सोशल मीडियावरून समर्थनार्थ लोकं पुढे देखील सरसावले. या प्रकरणावर आता 'स्टार प्रवाह' वाहिनीने आपली प्रतिक्रिया मांडली आहे.
'स्टार प्रवाह' वाहिनीने एक परिपत्रक जाहीर केलं आहे. यामध्ये किरण माने यांचं महिला कलाकारांसोबत गैरवर्तणूक असल्याचा आरोप केला आहे.
किरण मानेंच्या राजकीय भूमिकेवरून काढले नसल्याचेही स्पष्टीकरण दिलं आहे. किरण माने यांनी लावलेले आरोप बिनबुडाचे आणि काल्पनिक आहेत. असे आरोप होणे ही दुर्दैवी बाब आहे. ('कोणता बाप आपल्या लेकीसोबत असं वागतो?' किरण मानेंवर गंभीर आरोप)
किरण माने यांना महिला कलाकारांसोबत गैरवर्तणूक केल्यामुळे मालिकेतून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सहकलाकार, दिग्दर्शक आणि मालिकेतील युनिटमधील सदस्यांनी अनादरपूर्ण आणि आक्षेपार्ह वागणुकीविरूद्ध अनेकांनी तक्रारी केल्या आहेत.
या प्रकरणात आता मनसे देखील मैदानात उतरली आहे. मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी मला या प्रकरणावर काही बोलायचं नाही असं एका मुलाखतीत सांगितलं आहे, किरण माने यांनीच मालिकेतील इतर कलाकारांना त्रास दिला. योग्य वेळी याबाबत आम्ही भुमिका घेऊ, असं त्यांनी सांगितलं.
राजकीय भूमिका घेतल्याने मला कुठलीही पूर्वकल्पना न देता मालिकेतून बाहेर काढला असं असं किरण माने यांचं म्हणणं होतं. यावर अमेय खोपकर म्हणाले, 'कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच वेळ झाली. राजकीय भूमिकेमुळे नव्हे तर त्यांच्या वर्तणुकीमुळे त्यांना मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. या सगळ्यावर योग्य वेळी मनसे आपली भुमिका मांडेल, असं खोपकर म्हणाले.