मुंबई : विनोदी चित्रपट, मालिका देऊन मराठी प्रेक्षकांना हसवणारे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी आता हिंदीत पदार्पण केले आहे. कॉमेडीचा उत्तम सेन्स असणारे केदार शिंदे ‘क्या हाल मिस्टर पांचाल’ ही हिंदी मालिका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
दिग्दर्शक केदार शिंदेने मराठीमध्ये अनेक सिनेमे आणि नाटकांचे दिग्दर्शन केलं आहे. त्यांच्या 'घडलंय बिघडलंय', 'हसा च क ट फू', 'श्रीयुत गंगाधर टिपरे' यांसारख्या मालिका अत्यंत लोकप्रिय ठरल्या. हिंदीमध्ये दिग्दर्शक म्हणून केदार शिंदे यांची ‘क्या हाल मिस्टर पांचाल’ ही पहिली मालिका लोकांच्या भेटीला येतेय. एक आई आपल्या मुलासाठी सर्वगुण संपन्न अशा वधुच्या शोधात असते आणि त्यासाठी ती देवाला साकडे घालते. भगवान शंकर प्रसन्न होऊन पाच वेगवेगळ्या स्वभावाच्या वधूंचा आशीर्वाद देतो. या सर्व गोंधळात मुलाचे काय हाल होतात, अशी विनोदी कथा आहे.
केदार शिंदे यांची ही पहिलीवहिली हिंदी मालिका असल्यामुळे सगळं नव्याने सुरु करण्यातही एक वेगळी मजा येत आहे असं ते म्हणतात. याविषयी केदार म्हणाले की, ‘ही मालिका माझ्यासाठी जितकी नवी आहे तितकी सर्व कलाकारांसाठी सुद्धा नवी आहे. इथे काम करणाऱ्या प्रत्येक कलाकाराने त्यांच्या आधीच्या मालिका व सिनेमांमध्ये गंभीर भूमिका केल्या आहेत. या सर्व कलाकारांना विनोद शिकवणं हे खूप आव्हानात्मक आहे आणि हे काम करण्यात सुद्धा तितकीच मजा येतेय.’
केदार शिंदे दिग्दर्शित तसेच विपुल शाह आणि ऑप्टोमिस्ट्रीक्स प्रोडक्शन निर्मित ‘क्या हाल मिस्टर पांचाल’ मालिका २८ ऑगस्ट २०१७ पासून स्टार भारत वाहिनीवर सुरु झालीये.