मुंबई : जे नेहमी समाजाच्या चेष्टेचा विषय होते..ज्यांचं कौशल्य त्यांच्या शारीरिक उणीवांमुळे गौण ठरवलं गेलं...त्यांनी आज त्यांच्या कौशल्याने सर्वांची तोंड बंद केली आहेत आणि अनेकांसाठी त्यांचा प्रवास प्रेरणादायी ठरतोय. कारभारी लयभारी मालिकेच्या निमित्ताने हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले की ज्याच्या अंगी कौशल्य आहे त्याला कोणतेही व्यंग मागे राखू शकत नाही. झी मराठीवरील 'कारभारी लयभारी' या मालिकेत काम करत असणारे तीन चेहरे ‘महेश जाधव, गंगा आणि दीपक साठे’ सध्या त्यामुळेच चर्चेचा विषय ठरत आहेत.
महेश जाधव या मालिकेत जगदीश पाटीलची भूमिका साकारत आहे. याआधी 'लागिरं झालं जी' मालिकेत तो टॅलेंट म्हणून अवघ्या महाराष्ट्राचा लाडका झाला होता. आजवर उंचीने कमी असणाऱ्या कलाकारांना केवळ दुय्यम आणि विनोदी भूमिकांसाठी निवडलं जायचं. पण 'लागिरं झालं जी'मध्ये महेश भय्यासाहेबचा राइट हॅण्ड म्हणून दिसला तर 'कारभारी लयभारी' मालिकेत तो चक्क व्हिलनची भूमिका साकारतोय. जग्गूदादाच्या टेररपुढे भल्या भल्यांच्या तोंडचं पाणी पळतंय.
'डान्सिंग क्वीन' या शोमधून गंगा हा चेहरा महाराष्ट्रासमोर आला. ट्रान्सजेंडर असलेल्या गंगाचा स्वत:च अस्त्तित्व सिद्ध करण्यापासून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्यापर्यंतचा प्रवास अत्यंत बिकट होता. झी युवाच्या मंचावर गंगाला पहिल्यांदा ओळख मिळाली आणि त्यानंतर कारभारी लयभारी मालिकेत ती कलाकार म्हणून वेगळ्या भूमिकेत लोकांसमोर आली आहे. आपल्या अभिनय कौशल्यावर तिने ही भूमिका मिळवली असून अत्यंत समजूतदारपणे ती तिच्या भूमिकेला न्याय देत आहे.
गेल्या काही दिवसांत अकलूज आणि संपूर्ण महाराष्ट्रात आणखी एक नाव गाजत आहे, ते म्हणजे दीपक साठे. 'कारभारी लयभारी' मालिकेत गेल्या काही भागात प्रेक्षकांनी अडखळत बोलणारी साठे ही व्यक्तिरेखा पाहिली आहे. अनेकांनी सोशल मीडियावर या व्यक्तिरेखेला पसंती दर्शवली तर अनेकांनी हा अति करतोय...याचं कधी ऐकायचं वगैरे अशा नकारात्मक प्रतिक्रिया सुद्धा दिल्या.
पण इथे नमूद करायला हवं की दीपक साठे हे अकलूजमधील एक छोटे मोठे व्यावसायिक आहेत. अडखळत बोलण्याचा ते अभिनय करत नसून प्रत्यक्षातही साठे बोलताना अडखळतात. त्यांना मालिकेत काम करण्याची प्रचंड इच्छा होती. काम करताना आपल्यावर अनेक लोकं हसतील, चेष्टा करतील याचा विचार त्यांनी केला नाही. उलट आपल्यातल्या वैगुण्याला आपली ताकद बनवून साठे आत्मविश्वासाने कॅमेरासमोर आले. जे लोकं साठेंच्या अडखळत बोलण्यावर हसायचे तेच आज आवर्जून साठेंना भेटून त्यांचे अभिनंदन करत आहेत.
छोट्या छोट्या गावांमधून इंडस्ट्रीत काम करण्याचा स्ट्रगल आणि त्यातून शारिरीक व्यंगाची भर. त्यामुळे या कलाकारांसाठी हा प्रवास अधिक खडतर होता. लोकांनी केलेली चेष्टा मस्करी, टोमणे पचवून स्वत:वरचा विश्वास त्यांनी कधी ढळू दिला नाही. म्हणूनच आज मालिकेच्या माध्यमातून ते घराघरात पोहोचले आहेत आणि प्रेक्षकांचं मन जिंकताहेत. कारभारी लयभारी ही मालिका एक वेगळा विषय घेऊन प्रेक्षकांसमोर आली आहेच पण त्याचसोबत अशा अनेक कलाकारांच्या उपस्थितीने एक वेगळा पायंडा घालून देण्यात यशस्वी ठरली आहे. त्यामुळेच झी मराठी आणि कारभारी लयभारी मालिका मनोरंजन क्षेत्रात निश्चितच एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.