मुंबई: मला मुव्ही माफियांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते, असे वक्तव्य करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणौतला काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी एक सल्ला दिला आहे. कंगनाच्या या वक्तव्यानंतर भाजप आमदार राम कदम यांनी तिला मुंबई पोलीस चांगले असल्याचे सांगत आश्वस्त केले होते. परंतु, पोलीस महाविकासआघाडी सरकारच्या दबावाखाली असल्याचे राम कदम यांचे म्हणणे होते.
ही तर बेईमानी... ; कंगना राणौतला संजय राऊतांनी सुनावलं
यानंतर कंगना राणौतने तात्काळ राम कदम यांच्या ट्विटला रिप्लाय देत त्यांचे आभार मानले होते. मात्र, माझा मुंबई पोलिसांवर विश्वास नसून मला थेट केंद्र सरकार किंवा हिमाचल प्रदेश पोलिसांकडून सुरक्षा मिळाली तर बरे होईल, असे कंगनाने म्हटले होते.
हाच धागा पकडत सचिन सावंत यांनी राम कदम यांना लक्ष्य केले. त्यांनी कंगनाच्या ट्विटवर रिप्लाय देताना म्हटले की, कंगना खरंतर तू ज्या व्यक्तीचे आभार मानतेयस, त्यालाच घाबरायला हवेस. ही व्यक्ती महिलांसाठी अत्यंत धोकादायक आहे, अशी टिप्पणी सचिन सावंत यांनी केली.
Well @KanganaTeam , actually you should be scared of the person whom you are thanking. Very dangerous for girls! https://t.co/EOkhMRlGDG
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) September 1, 2020
काही वर्षांपूर्वी दहीहंडी उत्सवादरम्यान राम कदम यांनी महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. यावरुन त्यांच्यावर बरीच टीकाही झाली होती. मात्र, आता सचिन सावंत यांनी पुन्हा त्याच प्रकरणाचा संदर्भ देत राम कदम यांच्यावर खोचक टिप्पणी केल्याने काँग्रेस आणि भाजप नेत्यांमध्ये वाकयुद्ध पेटण्याची शक्यता आहे.