मुंबई : समाजात तेढ निर्माण करण्याच्या आरोपाखाली दाखल झालेल्या गुन्ह्यात जबाब नोंदवण्यासाठी कंगना रनौत आज वांद्रे पोलीस ठाण्यात दाखल झाली. कंगनाला 8 जानेवारी 2021 रोजी दुपारी 12 ते 2 दरम्यान पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले होते. त्यामुळे आज पाऊणच्या सुमारास वांद्रे पोलीस ठाण्यात जबाब नोंदणीसाठी दाखल झाली. याआधी देखील कंगना आणि तिची बहिण रंगोली चंदेलला जबाब नोंदवण्यासाठी बोलवण्यात आले होते. मात्र दोघींनी वेग-वेगळी कारणं सांगत जबाब नोंदवण्याकरीता येण्यासाठी टाळाटाळ केली.
दरम्यान, दाखल झालेले आरोप फेटाळण्यासाठी कंगनाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका देखील दाखल केली होती. परंतु उच्च न्यायालयाने आरोप रद्द करण्यास नकार दिला. यांसह कंगना रनौत यांच्या अटकेवर बंदी घालण्यात आली.
मुंबई पोलिसांनी यापूर्वी तीन वेळा कंगना रनौत आणि रंगोलीला समन्स पाठविले होते. मात्र दोघीही चौकशीसाठी हजर राहिल्या नाहित. म्हणून गेल्या सुनावणी दरम्यान कोर्टाने कंगनाला मुंबईत परतण्याची तारीख विचारली होती. अखेर आज ती चौकशीसाठी वांद्रे पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.