पुलवामा हल्ल्याच्या त्या फोटोवर भडकली जान्हवी

शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आणि या हल्ल्याचा निषेध करण्यात बॉलिवूड कलाकारसुद्धा मागे राहिले नाहीत.

Updated: Feb 17, 2019, 02:52 PM IST
पुलवामा हल्ल्याच्या त्या फोटोवर भडकली जान्हवी title=

मुंबई : जम्मू काश्मीरच्या पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध जगाच्या कानाकोपऱ्यातून होत आहे. १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या हल्ल्यात ४० भारतीय जवानांना वीरमरण आले. या हल्ल्याच्या निषेधार्थ अनेक ठिकाणी आंदोलन करत शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. १४ फेब्रुवारी रोजी जैश-ए-मोहम्मद या आतंकवादी संघटनेने हा भयंकर हल्ला घडवून आणला. ज्यामुळे हल्ल्याचा मास्टरमाइंड आदिल अहमद दारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत पाकिस्तानचा विरोध करण्यात आला सोबतच साऱ्या देशभरातून सीआरपीएफच्या जवानांना आदरांजलीही वाहण्यात आली. 

शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आणि या हल्ल्याचा निषेध करण्यात बॉलिवूड कलाकारसुद्धा मागे राहिले नाहीत. ज्यामध्ये सध्या या हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली आहे 'धडक' फेम अभिनेत्री जान्हवी कपूर हिने. जान्हवीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एका पोस्टमध्ये पाकिस्तानी वृत्तपत्रातील लेखाच्या कात्रणाचा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये 'हा हल्ला स्वातंत्र्यासाठी होता....', असा उल्लेख करत हल्ल्याची माहिती देण्यात आली होती. 

जान्हवीने पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये, ''पुलवामा हल्ल्याचा राग करण्यामागे अनेक गोष्टी आहेत. मला एकाच गोष्टीची खंत वाटते ती म्हणजे आपल्या जवानांना लढण्याची एक संधीसुद्धा मिळाली नाही. दुसरं म्हणजे फोटोमध्ये एक लेख आहे. ज्यामध्ये दहशतवादी हा लढा त्यांचा स्वातंत्र लढा म्हणून 'साजरा' करत आहेत. राजकीय धोरणे पुर्णत्वास नेण्यासाठी माध्यमांकडून करण्यात आलेले वृतांकन हे अतिशय संतापजनक आहे. देशाच्या रक्षणासाठी या जवानांनी त्यांच्या प्राणांची आहूती दिली आहे. त्यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच प्रार्थना करत त्यांच्या कुटुंबीयांना या कठीण प्रसंगात खंबीरपणे उभं राहता यावं अशी मी कामना करते''असं तिने लिहिलं. या पोस्टमध्ये शेवटच्या ओळीत तिने  #jaihind असा हॅशटॅगही वापरला आहे