नवी दिल्ली : बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता इरफान खानने काही दिवसांपूर्वीच त्याला कोणतातरी गंभीर आजार झाला असल्याची माहिती आपल्या चाहत्यांना ट्विटरच्या माध्यमातून दिली. तसंच त्यासाठी प्रार्थना करण्यासही सांगितले. त्या ट्वीटनंतर इरफानला नक्की काय झाले आहे याबद्दलच्या चर्चा सुरु झाल्या. पण कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. मी सत्य स्वतःहुन सांगेन, असे आवाहन त्याने चाहत्यांना केले.
त्यानंतर आता इरफानच्या पत्नीने फेसबुक पोस्टद्वारे इरफानच्या आजाराबद्दल सांगितले आणि त्याच्यासाठी प्रार्थना करण्यास सांगितले. सुतापाने पोस्टमध्ये लिहिले की, माझा सर्वात प्रिय मित्र आणि माझा जीवनसाठी एक योद्धा आहे. त्याने जीवनातील प्रत्येक लढाई खूप सुंदररीत्या लढली आहे. जगभरातून मिळालेल्या आर्शीवाद आणि शुभेच्छांबद्दल इरफान सर्वांचा मनापासून आभारी असल्याचे सुतापाने पोस्टमध्ये म्हटले आहे.
पोस्टच्या शेवटी तिने लिहिले की, माझे तुम्हा सर्वांना विनम्र निवेदन आहे की, तुम्ही जीवनाच्या विजय गीताकडे लक्ष द्या. खुश रहा. माझा परिवार लवकरच तुमच्या आनंदात सहभागी होईल. तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद.
इरफानच्या आजाराची खबर लागताच बॉलिवूडचे अनेक स्टार्स त्याच्यासाठी प्रार्थना करत आहेत. दिग्दर्शक विशाल भारद्वाजच्या सिनेमासाठी इरफान, दीपिका पदुकोणसोबत शूटिंग करत होता. मात्र त्याच्या आजारामुळे शूटिंग काही दिवसांसाठी रद्द करण्यात आली आहे.
— Irrfan (@irrfank) March 5, 2018