आता मला गर्भाशय नाही; सेलिब्रिटीचा खुलासा

गर्भाशय काढण्याची गरज असल्याचं कळताच.... 

Updated: Sep 1, 2019, 01:53 PM IST
आता मला गर्भाशय नाही; सेलिब्रिटीचा खुलासा  title=

मुंबई : सेलिब्रिटींचं आयुष्य वरवर कितीही हेवा वाटणारं वाटत असलं तरीही त्यांच्या आयुष्यातही अशा काही अडचणी येतात जे पाहता सेलिब्रिटींनासुद्धा काही आव्हानांचा सामना करावा लागतो ही बाब लक्षात येते. सध्याच्या घडीला अशाच एका सेलिब्रिटीने सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. 

आपल्यावर झालेल्या शस्त्रक्रियेविषयी माहिती देत या सेलिब्रिटीने तिचं गर्भाशय काढल्याचं सांगितलं आहे. आजारपण आणि एक महिला म्हणून समोर ठाकलेल्या संघर्षमय परिस्थितीता कसा सामना केला याविषयी खुलासा करणारा हा सेलिब्रिटी चेहरा आहे सुप्रसिद्ध सतार वादक आणि संगीत संयोजिका अनुष्का शंकरचा. 

पोटातील फायब्रॉईड इतके वाढले होते, की आपण सहा महिन्यांच्या गरोदर महिलेप्रमाणे दिसत असल्याचं लिहित अनुष्काने तिच्या गर्भाशयाला काढल्याची माहिती दिली. एकूण १३ ट्युमर शस्त्रक्रिया करत काढल्याचं ती या पोस्टच्या माध्यमातून म्हणाली.

गर्भाशय काढण्याची गरज असल्याचं कळताच आपण, नैराश्याचा सामना केला होता असंही तिने या पोस्टमध्ये लिहिलं. एक स्त्री असण्यावरच या बातमीमुळे भीतीचं सावट आलं होतं, नकारात्मक भावनेची चाहूल लागत होती. शस्त्रक्रियेमध्ये काही चूक झाल्यास आणि आपलं बरंवाईट झाल्यास दोन्ही मुलं आईविना पोरकी होतीस अशा भावनांनी अनुष्काच्या मनात घर केलं होतं. फक्त आपणच नव्हे, तर इतर किती महिलांना या परिस्थितीचा सामना करावा लागत असेल, असं म्हणत तिने खंत व्यक्त केली. 

दोन फोटोंच्या माध्यमातून आपला प्रवास, मनातील भीती, गरोदरपणादरम्यानची परिस्थिती आणि मनावर असणारं दडपण, या साऱ्या गोष्टी तिने या पोस्टमध्ये सर्वांसमोर मांडल्या आहेत. शिवाय महिलांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याविषयीचा सूरही तिने आळवला.