नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये भाजपा सरकार पुन्हा सत्तेवर आली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये अनेक दिग्गज कलाकार देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यापैकी काही भरघोस मतांनी विजयी झाले, तर काहींना पराभवाचा सामना करावा लागला. त्यापैकीच एक भोजपुरी अभिनेता निरहुआ. समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी दिनेशलाल यादव 'निरहुआ' यांचा चक्क २ लाख ५९ हजार मतांनी पराभव केला.
उत्तर प्रदेशच्या आझमगड मतदार संघातून भाजपा पक्षाच्या तिकीटावर निरहुआ निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यांची लढत समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांच्याशी होती. 'झी डीजीटल हिंदी'ला दिलेल्या मुलाखतीत निरहुआ म्हणाले की, 'लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला, तरी मी माझ्या उद्देशात विजयी झालो आहे. मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा देशाचे पंतप्रधान होताना पाहायचे होते.'
यापुढे ते म्हणाले की, 'लोकशाहीच्या या उत्सवात जनतेने आपल्या सरकारला प्रचंड मतांनी विजयी केले आहे. मी येथे खाजदार बनण्यासाठी आलो नव्हतो, मला खाजदाराच्या खुर्चीचा मोह नव्हता. माझा उद्देश फार मोठा आहे. माझ्या मते आपल्या देशात वंशभेद, जातीभेद आहे, आणि तो लोकशाहीमध्ये नसला पाहिजे. देशातल्या प्रत्येक नागरिकाने एकतेने रहायला हवे.' निरहुआला आझमगडच्या ३ लाख ६० हजार मतदारांनी आपले मत दिले होते.