नवी दिल्ली : दिग्दर्शक श्रवण डॅनियलने बलात्कार पीडितांविषयी अतिशय लाजिरवाणी, असंवेदनशील आणि तितकीच वादग्रस्त पोस्ट लिहिली आहे. त्याच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर याबाबत तीव्र शब्दात संताप व्यक्त केला जात आहे. हैदराबादमध्ये डॉक्टर तरुणीवर झालेल्या बलात्कार आणि हत्येनंतर दिग्दर्शकाने, महिलांनी त्यांच्यासोबत कंडोम ठेवलं पाहिजे आणि दुष्कर्म करणाऱ्याला सहकार्य केलं पाहिजे असं म्हटलंय.
श्रवणने फेसबुकवरुन, महिलांनी सोबत कंडोम ठेवायला हवं आणि पोलिसांना १०० नंबरवर फोन करुन स्वत:चा जीव वाचवण्याचा प्रयत्न करण्याचं सांगितलं. त्याने महिलांना दुष्कर्मीयांसोबत सहकार्य करण्याचंही सांगितलं आहे. दुष्कर्मीयांना कंडोम दिलं पाहिजे, जेणेकरुन पीडितांची हत्या होणार नाही. श्रवणने असं म्हणत नंतर त्याने ही पोस्ट फेसबुकवरुन डिलीट केली आहे.
डॅनियनने लिहिलंय, बलात्कार गंभीर गोष्ट नाही, परंतु हत्या अक्षम्य गुन्हा आहे. बलात्कारानंतर हत्या रोखल्या पाहिजेत. बलात्काऱ्याच्या राक्षसी विचारासाठी समाज आणि महिला संघटना जबाबदार असल्याचं त्याने म्हटलं. महिला सुरक्षा ही कंडोमने साध्य होईल, निर्भया कायद्याने नाही असं भुवया उंचावणारं वक्तव्य त्याने या पोस्टच्या माध्यमातून केलं.
न्यायालय, कायदे आणि सरकारने बलात्कारासाठी क्षमा केली, तर ते हत्येचा विचार करणार नाहीत. हिंसेविना बलात्कारास कायदेशीर मान्यता देणं, अशा प्रकारच्या हत्या थांबविण्याचा एकमेव मार्ग आहे. यामुळे बलात्कारी, समाज आणि कायद्यांच्या भीतीतून बाहेर येतील आणि पीडितेला जिवंत सोडलं जाईल. सरकारला १८ वर्षांवरील लोकांसाठी हा उपाय करणं गरजेचं आहे. बलात्कारानंतर हत्या करु नका, हिंसेशिवाय बलात्कार करा. हा मुलीचं आयुष्य वाचवण्याचा मार्ग असल्याचं त्याने म्हटलं. त्याने ही पोस्ट केल्यानंतर सर्वच स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
डॅनियलची ही पोस्ट गायिका चिन्मयी श्रीपदानेही शेयर करत डॅनियलवर आगपाखड केली आहे. डॅनियलला वैद्यकीय मदतीची गरज असल्याचा सल्ला नेटकऱ्यांकडून देण्यात येत आहे.