मनसे नेते अमित राज ठाकरे यांना मानाचा झी युवा नेत्रुत्व सन्मान जाहिर!

महाराष्ट्राच्या राजकारणातील नावाजलेले युवा नेतृत्व म्हणून आज श्री .अमित राज ठाकरे त्यांच्या कामांमुळे अतिशय लक्षवेधक ठरत आहेत . महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेतृत्व अमित राज ठाकरे यांना झी युवा वाहिनीच्या वतीने झी युवा नेतृत्व सन्मानाने गौरविण्यात आलं आहे.

Updated: Mar 17, 2024, 12:25 PM IST
मनसे नेते अमित राज ठाकरे यांना मानाचा झी युवा नेत्रुत्व सन्मान जाहिर! title=

मुंबई : झी युवा  वाहिनी नेहमीच तरुणाई आणि युवा वर्गाच्या कामाचं कौतुक करण्यासाठी पुढाकार  घेत असतं. समाजाचं भविष्य घडवणारी तरूणाई हा समाजाच्या प्रगतीचा कणा आहे. नवं काहीतर करून दाखवणारी, नव्या संकल्पनांना मूर्त रूप देणारी तरूणाई समाजासमोर आणून त्यांच्या शिरपेचात पुरस्काराचा तुरा रोवणाऱ्या प्रतिष्ठित 'झी युवा सन्मान २०२४ ' पुरस्काराकडे अनेकांचं लक्ष लागलेलं असतं. यावर्षीच्या झी युवा सन्मान २०२४ पुरस्काराची प्रतीक्षा संपली असून रविवार म्हणजेच ३१ मार्च २०२३ ला संध्याकाळी  ७ वाजता हा  सोहळा झी युवा वाहिनीवर प्रेक्षकांना पाहता येईल. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर  यांचे या सोहळयाला सहकार्य मिळालं आहे.
  
महाराष्ट्राच्या राजकारणातील नावाजलेले युवा नेतृत्व म्हणून आज श्री .अमित राज ठाकरे त्यांच्या कामांमुळे अतिशय लक्षवेधक ठरत आहेत . महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेतृत्व अमित राज ठाकरे यांना झी युवा वाहिनीच्या वतीने झी युवा नेतृत्व सन्मानाने गौरविण्यात आले. मात्र यावेळी त्यांनी मनातली एक खंत बोलून दाखवली . त्याच बरोबर श्री अमित राज ठाकरे यांना त्यांच्या कुटुंबाकडून मिळणारी एक वागणूक आणि त्यांच्या मुलाची त्यांच्याकडून अपेक्षा काय आहेत या बद्दलही ते बोलले.
  
महाराष्ट्रात नेतृत्व आणि वक्तृत्व यासाठी  ''राज ठाकरे'' हे नाव आपसूकचं  डोळ्यासमोर येतं. 'त्यामुळेच  ठाकरे नावाभोवती असणारी लोकप्रियता दिवसेंदिवस अधिकच वाढताना दिसते. हाच वारसा पुढे चालवत लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी सज्ज असलेले ठाकरे शैलीतील उभरते युवा नेतृत्व म्हणजे श्री अमित राज ठाकरे. मराठी माणसाचा बुलंद आवाज असणारे  श्री राजसाहेब ठाकरे यांच्या तालमीत तयार झालेले राजपुत्र  म्हणून श्री. अमित राज ठाकरे यांची ओळख असून देखील सामान्य माणसांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न हिरीरीने सोडवणारा युवा नेता म्हणून श्री. अमित राज ठाकरे यांनी आपल्या कर्तृत्वाची वेगळी छाप पाडली आहे. 

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थीसेनेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी  केलेल्या कार्याचं कौतुक महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणाने केलं. नवी मुंबई मनपा कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी त्यांनी मोर्चा काढला. रेल्वेचे प्रश्न मांडण्यासाठी अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या. महाराष्ट्र दौरा करून त्यांनी महाराष्ट्रातील अनेक समस्यांचा आढावा घेतला. एक नेता म्हणून त्यांनी प्रत्येक गोष्टीत जनतेचा विचार केला आणि म्हणूनच जनतेने त्यांना आपल्या जवळचा नेता मानलं. त्यांच्या या कार्याची विशेष दखल घेत श्री अमित राज ठाकरे यांना झी युवा वाहिनीच्या वतीने झी युवा नेतृत्व सन्मान देण्यात आला. 

यावेळी श्री. अमित राज ठाकरे आपल्या सन्मानाचा स्वीकार करताना म्हणाले, ''झी युवा नेतृत्व सन्मान सारखा मोठा अवार्ड मला मिळतोय ही खरचं माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. आणि मुख्य म्हणजे मी नेतृत्व सिद्ध करण्यापूर्वीच झी तर्फे माझा असा सन्मान करण्यात येत आहे, यात झी युवाचा  दूरदृष्टीपणा दिसतो आहे. यानिमित्ताने मला माझी आई, तसेच माझी पत्नी मिताली आणि बहिण उर्वशी यांचे आभार मानायचे आहेत , ह्या तिघी माझी प्रत्येक मुलाखत पाहून मला चांगले काम केलेस असा मेसेज करतात. 

मात्र आजपर्यंत माझ्या वडिलांचा मला मेसेज आला नाही. त्या मेसेजची मी खरचं वाट पाहतोय. म्हणजेच मला अजून जोमाने मोठे  काम करायला हवे  आणि आता माझे ते  ध्येय आहे. तसेच माझा मुलगा कियान याचाही मी खास उल्लेख करेन. माझा हा सन्मान पाहून त्याला मनोमन वाटले पाहिजे की माझे बाबा काही विशेष चांगले काम करताहेत. याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या सर्व सहकारी महाराष्ट्र सैनिकांचा मी खास उल्लेख करेन. त्यांनी मला स्वीकारले म्हणून मी आज इथे हा अवार्ड घेत आहे .ही सर्व युवा मंडळी उद्याच्या महाराष्ट्रातील राजकारणाचे भवितव्य आहे.  त्यांना मी हा मला मिळालेला पुरस्कार अर्पण करतो ' असे अमित ठाकरे यांनी आपल्या सन्मानाच्या भाषणात म्हटले.''
   
युवा नेतृत्व सन्मानाप्रमाणेच  समाजातील विविध क्षेत्रातील १२ विभागातील कर्तृत्ववान तरूणाईची निवड या झी युवा सन्मान २०२४ या पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील गुणवान युवांचा हा भव्यदिव्य सन्मानसोहळा पाहायला मिळणार आहे 'झी युवा' वाहिनीवर, रविवार ३१ मार्च  रोजी, संध्याकाळी ७ वाजता.