'बॅटमॅन'ला घराघरात पोहोचवणाऱ्या दिग्दर्शकाचं निधन

वयाच्या ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास   

Updated: Jun 24, 2020, 07:21 AM IST
'बॅटमॅन'ला घराघरात पोहोचवणाऱ्या दिग्दर्शकाचं निधन  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : 'बॅटमॅन' या अतिशय गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचे दिग्दर्शक जोएल शूमाकर यांचं निधन झालं. वयाच्या ८०व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक वर्षांपासून ते कर्करोगानं त्रस्त होते. जोएल शूमाकर ‘बॅटमॅन’ या सुपरहिरोपटासाठी प्रामुख्याने आळखले जातात. त्यांनी दिग्दर्शित केलेले ‘बॅटमॅन अँड रॉबिन्स’, ‘बॅटमॅन फॉरएव्हर’ हे दोन चित्रपट प्रचंड गाजले होते.

शुमाकर यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांमध्ये आजही कमालीची लोकप्रियता आहे. 'द लॉस्ट बॉईज', 'फॉलिंग डाऊन' हेसुद्धा त्यांचे गाजलेले चित्रपट. पण, त्यांना कारकिर्दीत खऱी ओळख दिली ती म्हणजे 'बॅटमॅन'नं. 

'बॅटमॅन'च्या या शृंखलेतील पहिल्या चित्रपटाला त्यांनी 'बॅटमॅन फॉरएव्हर'असं नाव दिलं होतं. वॉल किल्मर, टॉमी ली जोन्स, जिम कॅर आणि निकोल किडमॅन यांच्या या चित्रपटामध्ये महत्त्वाच्या भूमिका होत्या. जागतिक स्तरावर या चित्रपटानं तब्बल ३०० मिलियन इतकी जबर कमाई केली होती. याच शृंखलेमधील त्यांचा दुसरा चित्रपट होता, 'बॅटमॅन एँड रॉबिन'. यामध्ये जॉर्ज क्लूनीनं मुख्य पात्र साकारलं होतं. 

 

१९८० पासून १९९० पर्यत शुमाकर यांनी असे काही चित्रपट साकारले ज्यांना समीक्षकांकडून फार चांगला प्रतिसाद मिळाला नाही. पण, प्रेक्षकांनी मात्र या चित्रपटांना उचलून धरल्याचं पाहायला मिळालं होतं. अशा या अफलातून कलाकृतींचा नजराणा साकारणाऱ्या दिग्दर्शकाच्या जाण्यानं अनेक चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनीही दु:ख व्यक्त केलं आहे.