श्रद्धांजली वाहणं नकोसं झालं! रविंद्र महाजनींच्या निधनानंतर मराठी अभिनेत्रीची पोस्ट, गश्मीरचा उल्लेख करत म्हणाली...

Hemangi Kavi On Ravindra Mahajani Deathआपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारे दिग्गज अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या मृत्यूने चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या निधनानंतर अभिनेत्री हेमांगी कवीने एक पोस्ट केली आहे.   

Updated: Jul 16, 2023, 05:03 PM IST
श्रद्धांजली वाहणं नकोसं झालं! रविंद्र महाजनींच्या निधनानंतर मराठी अभिनेत्रीची पोस्ट, गश्मीरचा उल्लेख करत म्हणाली... title=
Hemangi Kavi post about Ravindra Mahajani and slam social media users and support gashmeer Mahajani

Ravindra Mahajani Death: मराठी चित्रपटसृष्टीतील देखणा नट अशी ओळख असलेले रविंद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांच्या निधनाने सारा महाराष्ट्र हळहळला. तळेगाव दभाडेजवळील आंबी गावातील एका फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह आढळला. दोन दिवसांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवला होता. गेल्या काही महिन्यांपासून ते एकटेच राहत होते. रविवारी पुण्यातच त्यांच्यावर अत्यंसंस्कार पार पडले. दरम्यान, रविंद्र महाजनी यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांवर सोशल मीडियावर अनेक चर्चा रंगल्या आहेत. यासर्व चर्चांवर अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) हिने सडेतोड उत्तर दिलं आहे. 

रविंद्र महाजनी यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अनेक मान्यवर व दिग्गजांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मात्र, सोशल मीडियावर त्यांच्या कुटुंबाबाबत व अभिनेता गश्मीर महाजनीबाबत  नकारात्मक प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. तीन दिवसांपासून त्यांच्या कुटुंबाने त्यांच्याशी संपर्क का साधला नाही? असा सवाल केला जात आहे. नेटकऱ्यांच्या या टीकेला अभिनेत्री हेमांगी कवी हिने उत्तर दिलं आहे. एक पोस्ट शेअर करत तिने नेटकऱ्यांचा समाचार घेतला आहे. 

हेमांगी कवीची पोस्ट

काल जेष्ठ अभिनेते रविंद्र महाजनी गेल्याचं कळलं. अर्थात आधी सोशल मिडिया वरून नंतर न्यूज चॅनलमधून. पण ते गेल्याची पेक्षा ते ‘कसे’ गेले याचीच ‘बातमी’ सर्वत्र जास्त पसरली! जाणाऱ्याला नीट जाऊ तरी द्या रे, असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

नक्कीच बातमी देणाऱ्यांची आता ती style च झालीए बातम्या अशाप्रकारे लोकांपर्यंत पोचवण्याची! त्याशिवाय लोकं बातमीच बघत नाहीत असं त्यांना वाटतं. त्यांचा दोष नाही, शेवटी प्रत्येकाला पोट आहेच, असं तिने म्हटलं आहे. 

पण त्या बातमीवर आलेल्या comments वाचून माणूसपणाची सिसारी आली. ते इतकं अंगावर आलं की श्रध्दांजली वाहणं नकोसं झालं! त्या व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही ही माहीत नसताना वाट्टेल ते बोलत सुटले लोक! त्यांच्या मुलाबद्दल, पत्नीबद्दल! असं मरण अनेक लोकांना येत असावं पण केवळ ते अभिनेते होते, प्रसिद्ध होते म्हणून वाट्टेल ते बोलण्याचा परवाना घेतला आपण

ज्या Hero ला आपण लहानपणापासून पहात आलोय त्यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळणं खुप Surreal वाटतं मला! ‘रंगीबेरंगी’ सिनेमात तुमच्या सोबत तुमच्या मुलीचं काम करण्याचं भाग्य मला लाभलं! रविंद्रजी जिथं कुठं आहात तिथं शांत असाल आणि आम्हांला माफ कराल अशी मी आशा करते!, असं तिने म्हटलं आहे. पोस्टमध्ये तिने गश्मीरलाही उल्लेख केला आहे. गश्मीरचा उल्लेख करत ती लिहिते की, गश्मीर महाजनी आधीच इतका struggle करून उभा आहेस, त्यात आता याची भर! Really very very sorry! And Strength to you, boy!, असं तिने म्हटलं आहे. 

पुढे नेटकऱ्यांना उद्देशून ती म्हणतेय की, Yes, Social Media वर किंवा कुठेही व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य सगळ्यांना आहे पण जरा तार्तम्य ठेवलं तर नाही का चालणार? बातमी देणाऱ्यांना चेहरा नाही पण आपल्याला आहे! हे थोडं लक्षात ठेऊया! बास.