मुव्ही रिव्ह्यू : जिभेसोबत मनात घर करणारा मुरलेला ‘गुलाबजाम’

‘गुलाबजाम’ म्हटलं की, बहुतेकांच्या तोंडाला पाणी सुटलं म्हणून समजाच. जितका चवीला चांगला तितकाच हा पदार्थ दिसायलाही आकर्षक...

Amit Ingole Amit Ingole | Updated: Feb 15, 2018, 04:40 PM IST
मुव्ही रिव्ह्यू : जिभेसोबत मनात घर करणारा मुरलेला ‘गुलाबजाम’ title=

अमित इंगोले, झी मीडिया, मुंबई : ‘गुलाबजाम’ म्हटलं की, बहुतेकांच्या तोंडाला पाणी सुटलं म्हणून समजाच. जितका चवीला चांगला तितकाच हा पदार्थ दिसायलाही आकर्षक...

एकदा का गुलाबजाम खाल्ला तर त्याची चव जिभेवर पुढील बराच वेळ असते आणि ती जाऊ नये अशीच अनेकांची भावना होत असेलही. याच लोकप्रिय पदार्थासारखा खुमासदार ‘गुलाबजाम’ सिनेमा दिग्दर्शक सचिन कुंडलकर हे घेऊन आले आहेत. याआधी आलेला त्यांचा ‘वजनदार’ सिनेमाही मेनस्ट्रीम सिनेमाच्या पठडीपेक्षा वेगळ्या वळणावर जाणारा होता. त्याच त्या रेंगाळलेल्या, घासूनपुसून चोथा झालेल्या कथांना बाजूला सारून ते पुन्हा एकदा एक मानवी भावभावना दाखवणारी कथा ते घेऊन आले आहेत. 

‘गुलाबजाम’ची कथा

ही कथा आहे आदित्य आणि राधा या दोन आपल्या विश्वात गुंतलेले दोन व्यक्ती. आदित्य हा लंडनला नोकरीला असतो. पण त्यात तो रमत नाही. त्याला चांगला महाराष्ट्रीय स्वयपाक शिकायचा असतो. तो थेट पुणे गाठतो. इथे तो चांगला स्वयपाक शिकवणा-याच्या शोधात असतो. ज्या मित्रांकडे तो रहायला आलेला आहे त्याच्यासाठी आलेला मेसचा डबा जेवायला घेतो. त्यात ते जेवण जेऊन तो भारावून जातो. पुढे त्याच डब्यात असलेले गुलाबजाम तो खातो आणि आणखीन भारावून जातो. या बाईचा शोध तो घेतो. राधा आगरकर ही एकटी राहते. तिचा वेगळा भूतकाळ आहे. तिच्या वागण्याला भूतकाळ आहे. ती आदित्यला स्वयपाक शिकवण्यास नकार देते. फार विनवण्या केल्यावर ती तयार होते. सुगरण राधाचा शिष्य होणे हि सोपी गोष्ट नाही, हे आदित्यला कळून चुकते. ह्या प्रवासात दोघांनाही एकमेकांची मने आणि भूतकाळातील प्रसंग समजतात आणि माणूस म्हणून ते दोघे एकत्र स्वयपाक करताना समृद्ध होत जातात. याची ही कथा आहे. 

कसा आहे सिनेमा?

‘गुलाबजाम’ हा ट्रेलरवरून वेगळा नेहमी न पाहिलेला विषय असेल असे जाणवले होते. तसाच तो आहे. नेहमीच्या रटाळ झालेल्या कथांपेक्षा वेगळी आणि इंटरेस्टींग कथा यात आहे. नेहमीच्या सिनेमांमधील ब-याच गोष्टी यात नाहीत. कथा फार वेडीवाकडी वळणं घेत नाही. उगाच गुंतवूण ठेवण्यासाठी ओढताण नाही. सरळ, साधी आणि सोपी ही कथा आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे साधीस-सोपी कथा असूनही ती आपल्याला गुंतवूण ठेवते. खरंतर आपल्याकडे अशा वेगळ्या कथा फारच कमी बघायला मिळतात. 

कशी आहे कथा?

‘गुलाबजाम’ची कथा, पटकथा आणि संवाद दिग्दर्शक सचिन कुंडलकर आणि तेजस मोडक यांनी मिळून लिहिले आहे. दोघांनीही फारच उत्तम लेखन केलंय. काही सीन्स जरा स्लो झालेत. ते सोडले तर सिनेमा व्यवस्थीत मनोरंजन करतो. सिनेमातील डायलॉग्सही मस्त जमले आहेत. उगाच नाटकी वाटत नाहीत, जे बोललं जातं ते यात आहे. त्यामुळे सीन्स कनेक्ट होतात. जनरले सिनेमाचं कमर्शिअल वेटेज वाढवण्यासाठी जी ठिगळं लावली जातात ती यात अजिबात नाहीयेत. त्यामुळे सिनेमा अधिक थेट भाष्य करतो. केवळ त्या दोघांच्या मनाची, त्यांच्या स्वभावांची घालमेलच यात नाहीतर आपण कसं जगलं पाहिजे. आपल्यावर आलेल्या वादळांना कसं परतवून लावलं पाहिजे हे यातून अनपेक्षितपणे दाखवलं जातं. फक्त या सिनेमात स्वयपाक शिकवणं हे अधिक डिटेलमध्ये असतं तर आणखी चांगलं वाटलं असतं. लेखनासाठी दोघांनाही खास क्रेडिट दिलं पाहिजे. 

कसं आहे दिग्दर्शन?

सचिन कुंडलकर हे एक चांगले लेखक म्हणूनही प्रसिद्ध आहेत. त्यांनी याआधी काही सिनेमांचं लेखन केलंय. या सिनेमासाठी त्यांनी लेखन आणि दिग्दर्शन अशा दोन्ही जबाबदा-या पार पाडल्या आहेत. एक दिग्दर्शक म्हणून त्यांना या सिनेमाला जो न्याय द्यायचा होता तो त्यांनी दिलाय. जसं आधी म्हटलंय तसे काही सीन्स जरा रटाळ झाल्याने मजा किरकिरा होतो. पण एकंदर सिनेमाचं दिग्दर्शन त्यांनी उत्तम केलंय. त्यांनी कलाकारांच्या भूमिकांनाही योग्य न्याय दिलाय. 

कलाकारांची कामे कशी झाली?

सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकर ही जोडी पहिल्यांदाच एकत्र काम करतीये. दोघांनीही आपापल्या भूमिका चोख साकारल्या आहेत. सिनेमात दोनच भूमिका असल्याने दोघांनाही आपल्या भूमिका साकारण्यासाठी मोठा स्कोप निर्माण झाला. आणि त्यांनी त्याचा पुरेपुर फायदा त्यांना झाला. आपलं स्वप्न पूर्ण करण्याची धडपड सिद्धार्थने आदित्यच्या भूमिकेतून कमाल साकारली आहे. त्याचं ते इंग्लिश-मराठी वागणंही अजिबात ऑड वाटत नाही. तर सोनाली कुलकर्णीनेही नेहमीप्रमाणे आपल्या कामात जबरदस्त फोडणी लावली आहे. खरंतर ही भूमिका लिहिली फार फार कठिण गेलीये. मात्र सोनालीने सिक्सर लगावला आहे. तिचं वेगळेपण तिने फारच काटेकोरपणे यात जपलंय. सोनालीची दोन्ही रूपे मग ती भावडी असो वा भांडखोर त्यांना तिने योग्य साकारलं आहे. दोघांच्याही भूमिका लक्षात राहतात. या दोघांसोबतच महेश घाग, मधुरा देशपांडे, चिन्मय उदगीरकर आणि मोहनाबाई यांच्याही भूमिका छोट्या पण चांगल्या झाल्यात. 

संगीत आणि पार्श्वसंगीत

या सिनेमाचा महत्वाचा भाग हा या सिनेमाचं संगीत आणि पार्श्वसंगीत आहे. यात कोणतीही लव्हस्टोरी नसल्याने अर्थातच वेगळी गाणी ऎकायला मिळणार होती. तशीच वेगळी ती आहेत. सिनेमाला देबार्पितो साहा यांनी दिलेलं पार्श्वसंगीत सीन्सची मजा, गंभीरता फुलवतं. तर सिनेमातील 'मन खमंग' हे गाणंही मस्त झालंय. हे गाणं थायकुड्डम ब्रिज यांनी कंपोज केलं असून हे गाणं लिहिलंय तेजस मोडक यांनी तर स्वरबद्ध केलंय अवधूत गुप्ते यांनी. 

सिनेमटोग्राफी

मिलिंद जोग यांनी हा सिनेमा अधिकाधीक सुंदर करण्यासाठी घेतलेले मेहनत दिसते. पुण्यातील शनिवार पेठ त्यांनी फारच वेगळ्या पद्धतीने दाखवली आहे. त्यामुळे डोळ्यांना आनंद मिळतो. सिनेमा आणखी आकर्षक होतो. फारच चकचकीत सिनेमा त्यांनी आपल्या कॅमेरातून टिपला आहे. 

एकंदर काय?

एकंदर काय तर एक वेगळी कथा या सिनेमातून तुम्हाला बघायला मिळते. नेहमीच्या कथांमधून कंटाळा आलेला असेल तर हा सिनेमा एकदा नक्कीच बघता येईल. अर्थातच जर वेगळ्या सिनेमांची आवड असेल तरच. अन्यथा अपेक्षाभंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासोबतच मानवी भावभावना, स्वप्न, कष्ट, अडचणी यावरही यातून भाष्य केलंय. कलाकारांची कामे उत्तर झाली आहेत. तुम्ही सिद्धार्थ आणि सोनालीचे फॅन असाल तर नक्कीच बघा.

रेटींग - ३.५ स्टार