मुंबई : 20 वर्ष अभिनय कारकीर्द गाजवल्यानंतर अभिनेता रितेश देशमुख एका आगळ्या वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे .मुंबई फिल्म कंपनीने आज 6 व्या मराठी चित्रपटाची घोषणा केली आणि या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनेता रितेश देशमुख करणार आहे.
तसेच विशेष बाब म्हणजे या चित्रपटाद्वारे अभिनेत्री जेनेलिया देशमुख या मराठी चित्रपटात पदार्पण करत आहेत. लग्नानंतर रितेश देशमुखसोबत जेनेलिया पहिल्यांदाच मराठी सिनेमात मुख्य भूमिका साकारणार आहे.
या पूर्वी जेनेलियाने हिंदी ,तेलगू ,तमिळ ,कन्नड आणि मल्याळम अशा तब्बल 5 भाषिक चित्रपटांमध्ये काम केले आहे तसेच अभिनेत्री जिया शंकर या चित्रपटात भूमिका साकारत आहेत,आज या चित्रपटाचा मुहूर्त संपन्न झाला.
रितेश देशमुख आणि जेनेलिया यांची जोडी बॉलिवूडसह मराठी सिनेविश्वातही लोकप्रिय आहे. अनेक कार्यक्रमांना ही जोडी एकत्र हजेरी लावते. दोघे त्यांच्या स्टाईलिंगसाठी ही तितकेच लोकप्रिय आहेत. आता ही जोडी एकत्र मराठी सिनेमा करत असल्यानं चाहते देखील आनंद व्यक्त करत आहेत.