मुंबई: मुंबई: आपल्या विनोदी अंदाजासाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेते संतोष मयेकर यांचं निधन झालं आहे. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचं निधन झाल्याचं कळत आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून ते मधुमेहाच्या आजाराशी लढा देत होते.
वयाच्या ५२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला असून, त्यांच्या पश्चात पत्नी आहे.
फू बाई फू या कार्यक्रमात त्यांनी आपल्या धमाल विनोदी शैलीने प्रेक्षकांची मनं जिंकली होती.
विविध मालिका आणि नाटकांमध्येही त्यांच्या भूमिका पाहायला मिळाल्या होत्या. 'भैय्या हातपाय पसरी' या नाटकातील त्यांची भूमिका विशेष गाजली होती. 'देवाशप्पथ खोटे सांगेन', 'चष्मेबहाद्दर', 'गलगले निघाले', 'आर्त', 'दशक्रिया' या चित्रपटांतील त्यांच्या भूमिकाही गाजल्या होत्या.
'वस्त्रहरण' या लोकप्रिय नाटकाच्या बऱ्याच प्रयोगांमध्ये त्यांनी साकारलेली तात्या सरपंचांची भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. विनोदी शैलीवर असणारं प्रभुत्त्व आणि व्यासपीठावरचा त्यांचा वावर या गोष्टी त्यांना वेगळीच ओळख देऊन गेल्या होत्या.