'छपाक'ची छाप, टायटल सॉन्ग प्रदर्शित

गाण्याची सुरूवात होताच जोरात किंचाळण्याचा आवाज येतो आणि लक्ष्मीच्या संघर्षाची सुरूवात होते.  

Updated: Jan 3, 2020, 05:57 PM IST
'छपाक'ची  छाप, टायटल सॉन्ग प्रदर्शित  title=

मुंबई : 'हाथ मैं अंधेरा और आँख मैं इरादा...' जवळ फक्त अंधार आहे, पण जगण्याची इच्छा मात्र प्रबळ आहे. पण अंत:करण मात्र दु:खाने भरलेले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून 'छपाक' चित्रपटाची चर्चा जोरदार रंगली आहे. नुकताच 'छपाक' चित्रपटाचं टायटल सॉन्ग प्रदर्शित करण्यात आलं. हे गाणं ऐकल्यावर आणि पाहिल्यावर अंगावर शहारे उभे राहतील. ऍसिड पीडित लक्ष्मी अग्रवालच्या आयुष्यावर चित्रपटाची कथा फिरताना दिसत आहे. 

गाण्याची सुरूवात होताच जोरात किंचाळण्याचा आवाज येतो आणि लक्ष्मीच्या संघर्षाची सुरूवात होते. ऍसिड हल्ल्यामुळे विद्रुप झालेला चेहरा, खचलेलं मन, जळालेल्या त्वचेमुळे होणारा त्रास, चुकी नसतानाही भोगावी लागलेली शिक्षा, न्याय मिळवण्यासाठी सतत न्यायालयाच्या फेऱ्या या सर्व गोष्टींच चित्रीकरण गाण्याच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला.

प्रसिद्ध गितकार गुलजार लिखित या गाण्याला गायक अरिजीत सिंगच्या आवाजात स्वरबद्द करण्यात आले आहे. तर या गाण्याला शंकर एहसान लॉय यांनी संगीत दिले आहे. त्यामुळे या गाण्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. 

जेव्हा 'छपाक' चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला, त्यानंतर चित्रपटाच्या ट्रेलरने तर प्रेक्षकांच्या मनात वेगळीच छाप पाडली. अशी आव्हानात्मक कथा असलेल्या चित्रपटामध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोनच्या अभिनयाचे सर्वच स्थरातून कौतुक होत आहे. 'छपाक' चित्रपट १० जानेवारी रोजी रूपेरी पडद्यावर दाखल होणार आहे.