मुंबई : 'नेटफ्लिक्स'वरील डेव्हिड लेटरमॅनचा कार्यक्रम, 'माय नेक्स्ट गेस्ट नीड्स नो इंट्रोडक्शन'मध्ये आलेल्या एका खास सेलिब्रिटीने तिच्या आयुष्यात घडलेल्या अतिशय वाईट प्रसंगाचा खुलासा केला. स्वत:च्या सावत्र वडिलांकडूनच आपला लैंगिक छळ झाल्याची खळबळजनक बाब तिने सर्वांसमोर ठेवली.
शुक्रवारी प्रसारित होण्यासाठी सज्ज असणाऱ्या या कार्यक्रमात ऍलेन डिजेनेर या ग्लोबल सेलिब्रिटीने केलेला गौप्यस्फोट सध्या कलाविश्वात सर्वाचं लक्ष वेधत आहे. 'सीएनएन'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार ऍलेनच्या आईवर स्तनांच्या कर्करोगाचा उपचार सुरू असतानाच तिला या विदारक प्रसंगाचा सामना करावा लागला होता.
'आई बाहेर असतेवेळी त्यांनी मला आईच्या स्तनांमध्ये त्यांना एक प्रकारची गाठ जाणवली होती, असं सांगितलं. त्यांना माझ्या स्तनांना स्पर्श करुन पाहायचं होतं. त्यांनी कसंबसं मला तसं करु देण्यासाठी तयार केलं. त्यांनी वारंवार तीच कृती केली... पुन्हा पुन्हा तेच केलं', असं ऍलेन म्हणाली. तिने यापूर्वीही जवळपास २००५ मध्येही अशाच एका प्रसंगाची वाच्यता केली होती.
आपल्या वडिलांच्या या दुष्कृत्याविषयी सांगताना ती पुढे म्हणाली, 'मला माझी स्वत:चीच चीड येत आहे. मी अवघ्या १५- १६ वर्षांची होते, त्यावेळी मला नीट उभंही राहता येत नव्हतं. ते सारंकाही अत्यंत भयावह होतं.' आपल्यासोबत घडलेल्या त्या प्रसंगाविषयी विस्तृत माहिती देण्यामागचं कारणही ऍलनने स्पष्ट केलं. तरुणींसोबत असं काहीही होऊ नये, स्वत:सोबत त्यांनी असं काही करण्याची मुभा कोणालाही देऊ नये; यासाठीच आपण याविषयीची माहिती सर्वासमोर सांगत असल्याचं तिने स्पष्ट केलं.
सावत्र वडिलांच्या त्या कृत्याविषयी ऍलेनने लगेचच तिच्या आईला माहिती दिली नव्हती. आईची चिंता असल्यामुळे आणि तिची काळजी घेण्यासाठी म्हणून तिने ही गोष्ट लपवून ठेवली. पण, ही चूक केल्याची खंत ऍलेनने आता व्यक्त केली.
'मी माझ्या आईची काळजी करायला नको हवी होती. त्यावेळी मी माझा स्वत:चा बचाव करण्याची गरज होती. बरीच वर्षे मी तिला ही गोष्ट कळूही दिली नाही. त्यानंतर जेव्हा मी तिला त्या घटनेविषयी सांगितलं तेव्हा तिने माझ्यावर विश्वास ठेवला नाही. त्या माणसासोबत ती पुढची १८ वर्षे राहिली आणि शेवटी तिने त्याला सोडलं', असं ऍलेन म्हणाली.
आपण सांगितलेल्या या प्रसंगानंतर इतर मुलींना येत्या काळात याचा फायदा होईल अशी अपेक्षा तिने व्यक्त केली. पीडितांवर विश्वास न ठेवल्याचं पाहता आपल्याला प्रचंड चीड येत असल्याची प्रतिक्रीयाही तिने दिली.