प्रशांत अनासपुरे, झी मीडिया, मुंबई : 'एका लग्नाची पुढची गोष्ट' या नाटकाचा २०० वा प्रयोग प्रेक्षकांच्या हाऊसफुल्ल प्रतिसादात पार पडला. मुंबईतल्या शिवाजी मंदिर नाट्यगृहात रंगलेल्या या खास प्रयोगाला भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ विनय सहस्त्रबुद्धे, झी २४ तास आणि झी मराठी दिशाचे मुख्य संपादक विजय कुवळेकर, अभिनेता मनोज जोशी, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की, विजय केंकरे, मंगेश कदम आदी उपस्थित होते.
प्रशांत दामलेंसह सर्वच कलाकारांना प्रेक्षकांसह मान्यवरांची मिळालेली उत्स्फूर्त दाद हेच या व्दिशतकी नाट्यप्रयोगाचं खास वैशिट्य ठरलं. सर्व कलाकारांचा २०० व्या प्रयोगाच्या निमित्ताने यावेळी खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत खास गौरव करण्यात आला.
झी 24 तासच्या संघर्षाला हवी साथ या उपक्रमाला प्रतिसाद देत अभिनेता प्रशांत दामले यांनी आपल्या नाट्यसंस्थेतर्फे एक लाख अकरा हजार रुपयांची भरघोस मदत देत विद्यार्थ्यांच्या या संघर्षाला पाठबळ दिलं. बाबू कदम या वडिलांनी आत्महत्या केलेल्या मुलाच्या संघर्षाचे कौतुक करत ११ हजार रुपयांचा धनादेश मान्यवरांच्या उपस्थितीत सुपुर्द केला.
तसंच उर्वरित १९ मुलांनाही प्रत्येकी ५ हजार रुपयांची मदत प्रशांत दामले यांनी एका 'लग्नाची पुढची गोष्ट' या नाटकाच्या २०० व्या प्रयोगाच्या निमित्ताने जाहीरही केली. हे सर्व धनादेश दामले यांनी झी २४ तासचे मुख्य संपादक विजय कुवळेकर यांच्याकडे स्टेजवरच सुपुर्दही केले.