मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या शूर मावळ्यांनी स्वराज्याचा पाया रचून तो आणखी भक्कम केला आणि ही परंपरा पुढे सुरु ठेवली ती म्हणजे खुदद् छत्रपती संभाजी महाराजांनी. शौर्य, मातृभूमीप्रती निस्सिम प्रेम, नि:स्वार्थ प्रशासनाची तत्त्व हाताळत संभाजी महाराजांनी स्वराज्य पुढे आणलं. त्यांच्या याच किर्तीवंत कार्यावर आणि जीवनप्रवासावर प्रकाशझोत टाकत 'स्वराज्यरक्षक संभाजी' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली.
सुरुवातीपासूनच महाराजांच्या कारकिर्दीवर प्रकाशझोत टाकणाऱ्या या मालिकेत आता अखेरच्या टप्प्याचे क्षण प्रेक्षकांना पाहता येत आहेत. सध्याच्या घडीला संभाजी राजेंच्या स्वराज्यातील काहींनी त्यांच्याशी फितुरी करुन कशाप्रकारे विश्वासघात केला होता, याचं प्रत्ययकारी चित्रण मालिकेतून उभं करण्यात आलं आहे.
कल्पना नसतानाही, गर्द वनराईतून गनिम अखेर राजांपर्यंत पोहोचला आणि जे व्हायचं नव्हतं तेच झालं. झी मराठीकडून मालिकेच्या पुढील भागाची एक लहानशी झलक प्रेक्षकांच्या भेटीला आणली गेली आहे. ज्यामध्ये गनिमांचा वार स्वत:च्या छातीवर झेलणाऱ्या छत्रपती संभाजी राजांना त्यांच्याच काही साथीदारांना गमवावं लागल्याचं पाहायला मिळत आहे.
काळीज फाटेल, काळजात धस्स होईल, काळजाला घरे पडतील असा दुर्दैवी क्षण.
आज रात्री ९ वा. #SwarajyarakshakSambhaji #ZeeMarathi pic.twitter.com/4Xx8KimPHZ— Zee Marathi (@zeemarathi) February 13, 2020
पाहा : देवाब्राह्मणाच्या नव्हे, संविधानाच्या साक्षीने अभिनेत्याने बांधली लग्नगाठ
एकिकडे औरंगजेबावर वार करण्याच्याच तयारीत असताना दुसरीकडे मात्र फितुरांमुळे स्वराज्याला लागलेला हा सुरुंग एक मोठा हादरा देत असल्याचं या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे. संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे डॉ. अमोल कोल्हे यांचा अभिनय पाहता भूमिकेशी एकरुप होणं म्हणजे नेमकं काय, याचा प्रत्यय येत आहे. जो महाराष्ट्र आज प्रगीपथावर अभिमानाने वाटचाल करत आहे, त्याच्यासाठी कैक शूरवीरांनी प्राण पणाला लावले होते. त्याचीच ही गाथा म्हणजे, 'स्वराज्यरक्षक संभाजी'.