Oscar winner Director About Theaters: कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर मनोरंजनसृष्टीवरील ओटीटी प्लॅटफॉर्मची पकड अधिक घट्ट झाली आहे. हल्ली चित्रपटागृहांमध्ये जाऊन चित्रपट पाहण्यापेक्षा 'येईल काही दिवसात ओटीटीवर तेव्हा पाहू' असं म्हणणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मात्र असं असतानाही थेअटरमध्ये जाऊन चित्रपट पाहणाऱ्यांची संख्या आजही मोठी आहे. पण थेअटरमध्ये चित्रपट पाहण्यासाठी गेल्यावर आधी सामना करावा लागतो तो भरमसाठ जाहिरातींचा. या जाहिरातींची संख्याच एवढी असते की चित्रपट पाहण्याचा उत्साह काही प्रमाणात नक्कीच कमी होतो. याचसंदर्भात एका प्रत्येक चित्रपट चाहत्याला पटेल अशी मागणी एका दिग्दर्शकाने केली आहे.
हॉलिवूडमधील 'जोकर: फोली ए ड्यूक्स' चित्रपटाचे दिग्दर्शक टोड फिलिप्स यांनी चित्रपटगृहांसंदर्भात एक महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. थेअटरमध्ये चित्रपट सुरु होण्याआधी दाखवणाऱ्या जाहिराती दाखवल्या जाऊ नयेत, असं या जगप्रसिद्ध दिग्दर्शकांचं म्हणणं आहे. चित्रपट बघायला जाणाऱ्यांचा चित्रपट पाहण्याचा अनुभव अधिक समृद्ध व्हावा या उद्देशाने टोड फिलिप्स यांनी हा सल्ला दिला आहे.
'एम्पार' नावाच्या मासिकाशी बोलताना टोड फिलिप्स यांनी आपलं मत मांडलं आहे. चित्रपट बनवणाऱ्यांची चित्रपटसृष्टीच्या भविष्यासंदर्भात काय मतं आहेत, या विषयावर बोलताना टोड फिलिप्स यांनी अनेक प्रेक्षकांना खटकणारा हा जाहिरातींचा मुद्दा उघडपणे मांडला. आम्ही प्रेक्षक पैसे भरुन थेअटरमध्ये जातो मग आम्हाला तिथे गेल्यावर जाहिराती पाहण्याचं बंधन का घातलं जातं? असा सवाल टोड फिलिप्स यांनी उपस्थित केला आहे. "चित्रपटांच्या आधी दाखवल्या जाणाऱ्या जाहिराती बंद करा. आम्ही आधीच तिकींटासाठी पैसे मोजलेले असतात. चित्रपटगृहात येऊन चित्रपट पाहण्यासाठी आम्ही फार उत्साही असतो. मात्र या जाहिराती हा उत्साह मारुन टाकतात," असं ऑस्कर पुरस्कार विजेत्या टोड फिलिप्स यांनी म्हटलं आहे.
जोक्विन फिनिक्स आणि लेडी गागाची प्रमुख भूमिका असलेला 'जोकर: फोली ए ड्यूक्स' हा चित्रपट ऑक्टोबर महिन्यामध्ये प्रदर्शित झाला होता. मात्र हा चित्रपट दोन्ही व्यावसायिक स्तरावर तर तिकीट बारीवर आपटलाच पण समीक्षकांनीही या चित्रपटाबद्दल फारसं काही सकारात्मक मत नोंदवलं नाही. टॉड दिग्दर्शित हा चित्रपट म्युझिकल सायकोलॉजिकल थ्रिलर प्रकारातील कलाकृती आहे.
सध्या जाहिरातींचा हा मुद्दा चर्चेत असला तरी काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रामध्ये चित्रपटगृहांमध्ये मिळणाऱ्या महागड्या खाद्यपदार्थांचा मुद्दाही चांगलाच गाजला होता. वाटेल त्या किंमतीला खाद्यपदार्थ विकले जात असल्याच्या मुद्द्यावरुन त्यावेळेस रान उठलं होतं. मात्र नंतर यात पुढे धोरणात्मक कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.