मुंबई : चला हवा येऊ द्या या कर्यक्रमातील अभिनेता भारत गणेशपुरे यांना झाडीपट्टी बद्दल प्रश्न निलेश खरे यांनी विचारला, की कधी झाडीपट्टीत जाण्याचा योग आला का? तर भारत गणेशपुरे याचं असं म्हणणं आहे की, "झाडीपट्टीत काम करण्याचा मला अनुभव नाही. परंतू झाडीपट्टी मला माहित आहे. माझे खूप मित्र तिथे काम करतात. ती साधी सुधी इंडस्ट्री नाही, त्याचा बिझनेस 600 कोटी रुपयांचा आहे. ती इंडस्ट्री डेव्हलप होण्याच्या माध्यमातून शासनाने त्याकडे लक्ष द्यावं असे मला वाटते."
"माझी विनंती आहे की, शासनाने त्या इंडस्ट्रीत काम करणाऱ्या लोकांना इंश्यूरन्स काढूण द्यावा, जेणे करुन ते लोकं रात्री उशीरा प्रवास करतात तर त्यांना पण सिक्युरीटी वाटेल तेवढीच." असेही पुढे भारत गणेशपूरे म्हणाले.
विदर्भाला नैसर्गिक वारशाबरोबरच कलेचा तसेच सांस्कृतिक वारसासुद्धा लाभला आहे. गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या प्रदेशाला झाडीपट्टी असे म्हटले जाते. जंगलाचे अर्थात झाडीचे प्रमाण जास्त असलेली पट्टी म्हणजे भूप्रदेश म्हणजे झाडीपट्टी असे सरळ साधे समीकरण आहे.
या प्रदेशाची अजून एक खासियत म्हणजे इथे मोठय़ा प्रमाणावर विकसित झालेली झाडीपट्टी रंगभूमी!! शेतीकामातून थकूनभागून घरी आल्यावर चार घटका करमणूक हवीच. त्यांच्यासाठी इथे ही रंगभूमी असून त्यांची नाटकं मोठय़ा प्रमाणावर बघितली जातात. खूप मोठी आर्थिक उलाढाल या निमित्ताने इथे होत असते. अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह हा झाडीपट्टी रंगभूमीवर अवलंबून आहे.
चला हवा येऊ द्या या झी मराठीवरील मालिकेने अवघ्या मराठी माणसांची मनं जिंकली आहेत, त्यांना मनापासून हसायला लावलं आहे. असं म्हणू या की हसवून हसवून त्यांनी अनेकांचे चांगले चांगले आजार पळवून लावले असतील. अशा माणसांनी ज्यांना महाराष्ट्राला भरभरुन हसवलं, डोळ्यातून पाणी येईपर्यंत हसवलं अशा सर्व कलाकारांशी बातचित केली आहे, झी २४ तासचे संपादक निलेश खरे यांनी. कलाकारांनी त्यांच्या आयुष्यातील काही भन्नाट किस्से सांगितले आहेत.