मुंबई : 'पद्मावती' सिनेमाला होणा-या विरोधाचा वाद देशभरात गाजत असतांना आता 'दशक्रिया' या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मराठी सिनेमावर बंदी आणण्याची मागणी ब्राम्हण महासंघानं केली आहे. हा सिनेमा ब्राम्हणांची आणि हिंदू प्रथा-पंरपरांची बदनामी करणारा असल्याचा आरोप सिनेमावर करण्यात येत आहे.
'दशक्रिया' या सिनेमावर बंदी आणावी अशी मागणी महासंघाकडून करण्यात आलीये. ज्येष्ठ लेखक बाबा भांड यांच्या 'दशक्रिया' या कादंबरीवर आधारित या सिनेमाचं दिग्दर्शन संदीप पाटील यांनी केलयं. हिंदू धर्मातील दशक्रिया विधीची परंपरा आणि त्या अनुषंगाने अनेक जुनाट बाबींवर या सिनेमातून परखड भाष्य करण्यात आलयं. 'पद्मावती'चा वाद ताजा असतानाच दशक्रिया सिनेमाला झालेला हा विरोध खरचं कलाकारांच्या अभिव्यक्ति स्वातंत्र्यावर घाला आहे का? असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे.
यासंदर्भात महासंघाचे पदाधिकारी पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांना भेटून निवेदन देणार आहेत तसेच चित्रपटगृहाच्या मालकांना हा सिनेमा प्रदर्शित करू नये असेही महासंघाच्या वतीने सांगण्यात येणार आहे.
संदीप पाटील यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. दिलीप प्रभावळकर, मनोज जोशी यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासह अनेक महोत्सवामध्ये हा चित्रपट दाखविण्यात आला असून, प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट पटकथा, सहायक अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट असे पुरस्कार देखील मिळाले आहेत. येत्या शुक्रवारी (१७ नोव्हेंबर) हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.