मशीद बंद करण्याच्या मुद्द्यावर जावेद अख्तर यांची लक्षवेधी भूमिका

अख्तर यांनी आपलं मत मांडत.... 

Updated: Apr 2, 2020, 09:43 AM IST
मशीद बंद करण्याच्या मुद्द्यावर जावेद अख्तर यांची लक्षवेधी भूमिका title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : देशात बळावणारं Coronavirus कोरोना व्हायरसचं संकट टाळण्यासाठी म्हणून २१ दिवसांचं लॉकडाऊन करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांसमक्ष ठेवला. देशभरातून त्यांच्या या निर्णयाचं समर्थन करण्यात आलं. पण, यातच दिल्ली येथील निजामुद्दीन येथे तबलिगी जमातीच्या एका कार्ययक्रमात जवळपास दोन हजारहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला. 

इंडोनेशिया, मलेशिया, सौदी अरब, किर्गिस्तान अशा देशांतील नागरिकांचाही यामध्ये समावेश होता. 'ही सर्व परिस्थिती पाहता, अल्पसंख्यांक आयोगाचे माजी अध्यक्ष ताहिर मेहमूद यांनी दारुल उलूम देवबंद यांच्याकडे कोरोनाचं हे संकट असेपर्यंत सर्व मशीद बंद करण्याचा फतवा काढण्याची विचारणा केली', त्यांच्या याच मागणीचं अख्तर यांनी समर्थन केलं. 

अख्तर यांनी आपलं मत मांडत जर, काबा आणि मदीना येथील मशीद बंद केली जाऊ शकतात, तर भारतातील मशीद का नाही? असा प्रश्न उपस्थित केला. अख्तर यांनी हे ट्विट केल्यानंतर त्यावर अनेकांनीच प्रतिक्रिया देण्यासही सुरुवात झाली. देशावर ओढवलेलं कोरोना विषाणूचं हे संकट पाहता अख्तर यांच्या या लक्षवेधी भूमिकेचं अनेकांनी समर्थन केलं. 

 

कायमच स्पष्टपणे आपली मतं मांडणाऱ्या अख्तर यांची ही मागणी पाहता आता यावर गांभीर्याने काही निर्णय घेतले जातात का हे पाहणं महत्त्वाचं असेल. शिवाय प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने सामाजिक भान जपत लॉकडाऊनचं पालन करण्याचीही गरज आता भासू लागली आहे.