राष्ट्रगीतातील चुकीबद्दल विशाल भारद्वाज यांची सोशल मीडियावर तक्रार

आत्म्यासही पटत नाही 'ती' चूक   

Updated: Oct 30, 2018, 08:49 AM IST
राष्ट्रगीतातील  चुकीबद्दल विशाल भारद्वाज यांची सोशल मीडियावर तक्रार title=

मुंबई : चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि संगीतकार विशाल भारद्वाज यांनी सोशल मीडियाचा आधार घेत एक महत्त्वाची गोष्ट अनेकांच्याच निदर्शनास आणून दिली आहे.  त्यांनी ट्विट करत फिल्म डिव्हीजन आणि एमआयबी इंडियाचं अर्थात माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचंही लक्ष वेधलं आहे.

राष्ट्रगीतातील एका ओळीच्या वेळी काही तांत्रिक बिघाड असल्यामुळे ते ऐकण्यास योग्य वाटत नाही. त्यासोबतच एक भारतीय म्हणून आत्म्यासही ही चूक पटत नसल्याचं त्यांनी ट्विट करत स्पष्ट केलं. 

भारद्वाज यांनी मुंबई फिल्म फेस्टिव्हलच्या वेळी लावण्यात आलेल्या राष्ट्रगीताकडे सर्वांचं लक्ष वेधलं. 

फिल्म डिव्हीजन आणि माहिती व प्रसारण मंत्रालयातर्फे साकारण्यात आलेल्या राष्ट्रगीतातील या व्हर्जनमध्ये असणारे तांत्रिक बिघाड लक्षात घेऊन त्यात योग्य ते बदल करण्याची विनंतीही त्यांनी केली. 

दरम्यान, कोणत्याही चित्रपटगृहात चित्रपट सुरु होण्यापूर्वी राष्ट्रगीत वाजवणं सक्ती नसल्याचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाकडूनही स्वीकारण्यात आला आहे. पण,काही चित्रपटगृहांमध्ये मात्र राष्ट्रगीत अद्यापही लावलं जात आहे. 

चित्रपट सुरु होण्यापूर्वी राष्ट्रगीत लावलं जावं की नाही याविषयी अनेकांमध्येच दुमत पाहायला मिळालं होतं. त्यातच आता भारद्वाज यांचं ट्विट पाहता पुन्हा एकदा अशा चुकांकडे आणि राष्ट्रगीताच्या महत्त्वाकडे साऱ्यांच लक्ष वेधलं गेलं आहे.