लोकांच्या शिव्या मिळूनही The Kashmir Files फेम चिन्मय मांडलेकर का व्यक्त करतोय आनंद ?

बहुतांश भागांमध्ये या चित्रपटाचे शो हाऊसफुल्ल सुरु आहेत.

Updated: Mar 18, 2022, 02:01 PM IST
लोकांच्या शिव्या मिळूनही The Kashmir Files फेम चिन्मय मांडलेकर का व्यक्त करतोय आनंद ?  title=

मुंबई : The Kashmir Files या चित्रपटानं सध्या दमदार कामगिरी करत 100 कोटी रुपयांची कमाई केली आहे. बड्या बॉलिवूड चित्रपटांच्या यादीत अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटानंही जागा मिळवली आहे. बहुतांश भागांमध्ये या चित्रपटाचे शो हाऊसफुल्ल सुरु आहेत. (Chinmay mandlekar)

आतापर्यंत चित्रपटांचे जितके रिव्ह्यू समोर आले आहेत त्यांमध्ये एका पात्राविषयी किंबहुना एका व्यक्तीविषयी प्रचंड संताप प्रेक्षकांनी आणि प्रत्यक्ष खोऱ्यातील रहिवासी नागरिकांनी व्यक्त केला आहे.

सर्वांच्या कपाळावर आठ्या आणणारी ही व्यक्ती म्हणजे फारूख मल्लिक बिट्टा. अभिनेता चिन्मय मांडलेकर यानं ही भूमिका रुपेरी पडद्यावर साकारली आहे. जिथं एकिकडे त्याच्या अभिनयाची प्रशंसा केली जात आहे तिथेच मूळ पात्राच्या वृत्तीचा अनेकांनीच धिक्कारही केला आहे.

ही भूमिका साकारणाऱ्या चिन्मय मांडलेकर यानं चित्रपटासाठी आपली वर्णी लागण्यामागचं श्रेय दिलं आहे ते म्हणजे अभिनेत्री पल्लवी जोशीला.

चित्रपटाची स्क्रीप्ट वाचल्यानंतर आपल्या मनातही तिच भावना होती, जी सध्या चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांची आहे, असं चिन्मय माध्यमांशी संवाद साधताना म्हणाला. चित्रपटाचं कथानक आणि पात्राची गरज म्हणून क्रूरता दाखवणं अतिशय गरजेचं होतं, असंही त्यानं स्पष्ट केलं.

चित्रपटाची तयारी म्हणून चिन्मयनं बिट्टाच्या मुलाखतीचे काही व्हिडीओ पाहिले होते. हे व्हिडीओ पाहून खुद्द चिन्मयही हादरला होता. कारण, त्यामध्ये बिट्टानं आपण हत्या केल्याचं जाहीरपणे स्वीकारलं होतं. त्याच्या मानसिकतेपर्यंत पोहोचण्यासाठी चिन्मयनं प्रयत्न सुरु केले.

बिट्टाच्या डोळे मिचकावण्याच्या आणि रोखून पाहण्याच्या सवयीसाठी चिन्मयनं इतकी मेहनत घेतली की एका वळणावर त्याला ही सवय मोडण्यासाठी प्रयत्न करावे लागले. आपण साकारलेल्या कलाकृतीला असा प्रतिसाद मिळेल याची अपेक्षाच नव्हती असं तो म्हणतो.

चिन्मयला त्यानं साकारलेल्या भूमिकेसाठी अनेकांच्या शिव्याही मिळत आहेत. काही मित्र आणि कुटुंबातील मंडळींनीही आम्हाला तुझा राग आहे अशा प्रतिक्रिया त्याला दिल्या आहेत. पण, या पात्राच्या माध्यमातून आपण लोकांमध्ये ती संतापाची भावना जागवू शकलो यातच त्यानं आनंदही व्यक्त केला आहे.

एका कलाकाराच्या दृष्टीनं पाहिल्यास लोक माझा राग करत आहेत ही चांगली बाब असल्याचंही तो म्हणाला. एक कलाकार म्हणून प्रेक्षकांचं प्रेम स्वीकारण्याप्रमाणे प्रतिसादाचाच भाग म्हणून त्यांचा संतापही स्वीकारावा हाच संदेश चिन्मयच्या या वक्तव्यातून मिळतो.