भरमसाट Kissing,मर्यादा ओलांडणारे इंटिमेट सीन; तरीही Gehraiyaan का फसला?

अपेक्षा बऱ्याच होत्या, पण नात्यांच्या या गुंतागुंतीमध्ये या अपेक्षाही कुठेतरी गुरफटून गुदमरल्या. 

Updated: Feb 11, 2022, 04:19 PM IST
भरमसाट Kissing,मर्यादा ओलांडणारे इंटिमेट सीन; तरीही Gehraiyaan का फसला?  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे, धैर्य करवा यांच्या सोशल मीडियावर एकाच गोष्टीची झलक पाहायला मिळाली. ही गोष्ट होती, अशा नात्यांची जिथं प्रेम तर आहे, पण विश्वासाचा अभाव आहे. एकमेकांची साथ आहे, पण या साथीची समीकरणं मात्र काहीशी वेगळी आहेत. (Gehraiyaan Movie Review)

थोडक्यात सांगावं तर ही समीकरण काहीशी, नव्हे तर फारशी गंडली आहेत. 

शकुन बत्रा दिग्दर्शित 'गहराईयां' या चित्रपटाची ही गोष्ट. चित्रपटातील गाणी, विविध ठिकाणं, कलाकारांची वेशभूषा सर्वकाही सुरेख. 

आवश्यकतेनुसार किंबहुना, त्याहीपेक्षा जास्त किसिंग आणि इंटिमेट सीनचा भरणा, या साऱ्या घटकांसह हा चित्रपट अॅमेझॉन प्राईमवरुन चाहत्यांच्या भेटीला आला. 

अपेक्षा बऱ्याच होत्या, पण नात्यांच्या या गुंतागुंतीमध्ये या अपेक्षाही कुठेतरी गुरफटून गुदमरल्या. 

कुठे फसला चित्रपट... 
चित्रपटात मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या दोन जोड्या अलिबागला जातात काय आणि ही नाती बिथरतात काय. 

भावना ओतून साकारण्यात आलेल्य़ा या चित्रपटाच्या शेवटी काहीसं रितेपण जाणवू लागलं. चित्रपट संपल्यानंतर नेमकी कोणासाठी सहानुभूती दाखवावी हेच कळेना. 

मुख्य म्हणजे चित्रपटाच्या ट्रेलरपासून ते प्रसिद्धीपर्यंत यातील महत्त्वाचे चार चेहरे सातत्यानं एकत्र दिसले. पण, खरंतर चित्रपटामध्ये दीपिका आणि सिद्धांत यांच्या नात्यालाच अतीव महत्त्वं दिलं गेलं आहे. 

दीपिकानं केलेला अभिनय म्हणजे तिनं भूमिकेला दिलेला सार्थ न्याय. पण, शेवटी तिच्याप्रती न वाटणारी सहानु भूती एका अर्थी तिचं अपयश. 

प्रेमाच्या भावनांच्या उत्कटतेपासून ते इतर सर्व छटा या चित्रपटांमध्ये आहेत. इंटिमसी, आकर्षणही तितक्याच उच्च कोटीचं असतानाही प्रेक्षकांच्या मनात मात्र हा 'गहराईयां' अपेक्षित खोलीपर्यंत पोहोचला नाही, हेच खरं.