B'day Special : दीर्घायुषी हो... शाहरुखसाठी चाहत्यांची 'मन्नत'

वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी पाहिली शाहरुखची पहिली झलक 

Updated: Nov 2, 2019, 07:59 AM IST
B'day Special : दीर्घायुषी हो... शाहरुखसाठी चाहत्यांची 'मन्नत' title=
छाया सौजन्य- एएनआय

मुंबई : 'बडे बडे देशों मे ऐसी छोटी छोटी बातें होती रहती हैं....' असं म्हणणाऱ्या शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी मात्र २ नोव्हेंबर हा दिवस 'छोटी बात' वगैरे नाही. हेच पुन्हा एकदा या चाहत्यांनी सिद्धही करुन दाखवलं आहे. किंग खानच्या वाढदिवसाच्या निमित्ताने असंख्य चाहत्यांनी त्याच्या मुंबईतील 'मन्नत' या निवासस्थानाबाहेर गर्दी केली होती. 

शाहरुखचा वाढदिवस सुरु झाल्याक्षणीच या चाहत्यांनी त्याला शुभेच्छा देण्यासाठी थेट त्याच्या निवासस्थानाच्या दिशेने मोठ्या हक्काने धाव घेतली. बिहार, दिल्ली आणि इतरही बऱ्याच ठिकाणहून हे चाहते नित्यक्रमाने शाहरुख दीर्घायुषी होवो... ही 'मन्नत' करताना दिसले. 

आपल्यावर नि:स्वार्थ प्रेम करणाऱ्या या चाहत्यांचा उत्साह पाहून ५४वा वाढदिवस सादरा करणाऱ्या शाहरुखनेही या सर्व 'जबरा फॅन्स'ना हात उंचावत अभिवादन केलं, त्यांच्या प्रेमाचा स्वीकार केला. शाहरुख येताच तेथे उपस्थित सर्वच चाहत्यांनी एकच कल्ला करण्यास सुरुवात केली. 

मोठे बॅनर म्हणू नका किंवा किंग खानचं छायाचित्र असणारं टी- शर्ट, शक्य त्या सर्वच मार्गांनी आपल्या लाडक्या अभिनेत्याचा दिवस आणखी खास करण्यासाठीचा चाहत्यांचा प्रयत्न आणि शाहरुखवर असणारं त्यांचं प्रेम हेच त्याचं कलाविश्वातील मोठेपणही सांगून गेलं. 

शाहरुखसाठी बऱ्याच वेळापासून त्याच्या निवासस्थानाबाहेर प्रतिक्षा करणाऱ्या चाहत्यांनी तो समोर येताच 'हॅप्पी बर्थडे टू यू...' असं गात त्याला शुभेच्छा दिल्या. त्यानंतर बराच वेळ त्याने सर्वांच्याच शुभेच्छांचा स्वीकार केला. चाहत्यांच्या आवाजाचा आणि उत्हासाचा आजूबाजूच्या परिसरामध्ये राहणाऱ्यांना त्रास होऊ नये यासाठी काळजी घेत शाहरुखने चाहत्यांना शांतता पाळत सुखरुप घरी जाण्यासही सांगितलं. एका कलाकाराप्रती चाहत्यांचं हे अमाप प्रेम दरवर्षी पाहायला मिळतं. किंबहुना या प्रेमात दरवर्षी वाढच होत असते.