मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीत 'मिस हवाहवाई' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनाचं वृत्त साऱ्यांना धक्का देऊन गेलं. पुसटशी कल्पनाही नसताना प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या अभिनेत्रीची एक्झिट आणखी एका व्यक्तीला धक्का देऊन गेली.
सेलिब्रिटी वर्तुळात श्रीदेवी यांच्याशी व्यक्तिगत नातं असणाऱ्या आणि एक कलाकार म्हणूनही त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव असणाऱ्या या व्यक्तीचं नाव म्हणजे मनिष मल्होत्रा. कॉस्ट्युम डिझायनर ते सेलिब्रिटी फॅशन डिझायनर असा मनिषचा प्रवास अनेकांना हेवा वाटेल असाच. आज तो ज्या टप्प्यावर आहे, तेथे असताना त्याला काही गोष्टी, काही व्यक्ती आवर्जून आठवतात. त्यातीलच एक नाव म्हणजे, श्रीदेवी.
'ह्युमन्स ऑफ बॉम्बे'शी संवाद साधताना मनिषने त्याच्या जीवनातील काही काळ, सेलिब्रिटी वर्तुळातील त्याचे सुरुवातीचे दिवस या साऱ्यावर प्रकाशझोत टाकला. आईला साडी नेसण्यामध्ये काही सल्ले देण्यापासून या क्षेत्राकडे त्याचा कल वाढला. तासन् तास बसून चित्र रेखाटून स्वत:चं स्वत:च शिकत मनिषने बारकावे टीपले. वयाच्या २५व्या वर्षी त्याला पहिली मोठी संधी मिळाली. पुढे, 'रंगीला' या चित्रपटाने त्याला वेगळी ओळख दिली.
पाहता पाहता मनिष मल्होत्रा हे नाव ओळखलं जाऊ लागलं. २००५ या वर्षी त्याने स्वत:चा ब्रँड सुरु केला. पण हे सोपं नव्हतं. श्रीदेवी यांच्या जाण्याने त्याला व्यक्तिगत आणि व्यावसायिक स्वरुपातही हादरा बसला होता. पण, कामाच्या बळावर त्याने तग धरला. सेलिब्रिटी विश्वात आता जवळपास ३० वर्षांसाठी काम करणाऱ्या मनिषला आजही फॅशन शो सुरु होण्यापूर्वी धडकी भरते. मुळात हे सारं कधीच बदलू नये, कारण हीच माझी ओळख आहे, असं मात्र तो न विसरता सांगतो.