'केबीसी'च्या १० पर्वाची पहिली कोट्यधीश आजही पतीच्याच प्रतिक्षेत...

जाणून घ्या त्यांची हृदयद्रावक कहाणी....  

Updated: Oct 4, 2018, 05:00 PM IST
'केबीसी'च्या १० पर्वाची पहिली कोट्यधीश आजही पतीच्याच प्रतिक्षेत... title=

मुंबई : 'देवियो... और सज्जनो...' असं म्हणत बिग बी अमिताभ बच्चन प्रत्येकवेळी काही नव्या चेहऱ्यांना, सर्वसामान्यांतील प्रेरणादायी व्यक्तीमत्वांना 'कौन बनेगा करोडपती'च्या मंचावर घेवून आले. यंदाचं 'केबीसी'चं हे दहावं पर्व. याच पर्वाला सध्या त्याची पहिली करोडपती स्पर्धक मिळाली आहे. त्या स्पर्धकाची संघर्षगाथा आणि आतापर्यंतचा प्रवास खुद्द बिग हींनाही प्रेरणा देऊन गेला असं म्हणायला हरकत नाही. 

'केबीसी'च्या दहाव्या पर्वातील एक कोटींच्या बक्षीसास पात्र ठरलेल्या त्या स्पर्धकाचं नाव आहे बिनिता जैन. 

एक कोटींची रक्कम जिंकल्यानंतर मुळच्या आसाममधील गुवाहाटी येथील असणाऱ्या बिनिता यांना एखाद्या सेलिब्रिटीप्रमाणेच वागणूक मिळत आहे. 

१४ प्रश्नांची उत्तर देत एक कोटींच्या बक्षीसाला गवसणी घालणाऱ्या बिनिता यांना आपण इतकी मोठी रक्कम जिंकली आहे, यावर विश्वासच बसंत नाहीये. 'इंडियन एक्स्प्रेस'शी संवाद साधताना त्यांनीच याविषयीचा आनंद व्यक्त केला. 

बक्षीस म्हणून मिळालेल्या रकमेचा वापर त्या आपल्या मुलाच्या उच्च शिक्षणासाठी करणार आहेत. 

सध्याच्या घडीला त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत असला तरीही कुटुंबात सर्वकाही सुरळीत सुरु असताना त्यांना एका वादळाचा सामना करावा लागला होता. 

कामाच्या निमित्ताने परदेशात दौऱ्यावर असतानाच त्यांच्या पतीचं अपहरण झाल्याचं कळलं. ते आजतागायत घरी परतलेले नाहीत. पण, या आघाताने खचून न जाता बिनिता यांनी शिकवणी घेत आपलं कुटुंब आणि मुलांचा सांभाळ केला. 

आजच्या दिवसालाही पती घराकडे परत येतील, अशीच आशा त्या मनात बाळगून आहेत. कितीही संकटं आली तरीही त्याने खचून न जाता त्यावर टिचून उभं राहत बिनिता यांनी खऱ्या अर्थाने स्वत:ला सिद्ध केलं आहे. 

मुख्य म्हणजे एक कोटींच्या प्रश्नाचं उत्तर दिल्यानंतर पुढेही सात कोटींच्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी अगदी योग्य दिलं होतं. पण, ते उत्तर देण्यापूर्वीच त्यांनी खेळ सोडला होता, ज्या कारणी त्या या बक्षीसाला मुकल्या. 

तरीही, बऱ्याच अडचणी, संकटं आणि आव्हानं पाहिल्यानंतर त्यांच्या वाट्याला आलेल्या या यशाबद्दल सध्या त्यांच्यावर सर्वच स्तरांतून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.