...आणि अभिनेत्रीच्या मदतीला धावले रिक्षावाले 'चाचा'

तिने अशा पद्धतीने मानले आभार... 

Updated: Mar 2, 2020, 05:46 PM IST
...आणि अभिनेत्रीच्या मदतीला धावले रिक्षावाले 'चाचा' title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : दर दिवशी जवळपास या शहरामध्ये राहणाऱ्या बहुतांळ नागरिकांना ज्या समस्येचा सामना करावा लागतो, ती समस्या म्हणजे वाहतूक कोंडीची. कोणालाही या समस्येवर तोडगा काढता आलेला नाही. अगदी सेलिब्रिटीसुद्धा या वाहतूक कोंडीच्या कचाट्यातून सुटलेले नाही. पण, या साऱ्या परिस्थितीमध्ये एका बॉलिवूड अभिनेत्रीच्या मदतीला धावला आहे तो म्हणजे मुंबईच्या रस्त्यांवर सफर करणारा, रिक्षावाला. 

मुंबईतील वाहतूक कोंडी, रस्त्यांवरुन वाट काढण्यात असमर्थ असणाऱ्या आलिशान कार आणि त्यातही वाट पाहत होणारी चिडचीड हे सारं टाळण्यासाठी म्हणून या अभिनेत्रीने कौटुंबीक कार्यक्रमात जाण्यासाठी चक्क रिक्षाचा वापर केला आहे. आपल्या भाचीच्या लग्नसमारंभाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या मेहंदी सोहळ्यासाठी रिक्षाने जाणारी ही अभिनेत्री आहे रवीना टंडन. 

सोशल मीडियावर रवीनाने तिच्या या रिक्षा सफरीचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये त्या प्रसंगाची थोडक्यात माहितीसुद्धा दिली आहे. रवीनाने रिक्षावाल्या गृहस्थांचा पहिला व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर अनेकांनीच त्यांनी तुला ओळखलं का, असा प्रश्नही केला. ज्याचं उत्तर देत तिने एक व्हिडिओही पोस्ट केला. ज्या व्हिडिओमध्ये रवीना ज्या रिक्षाने गेली ते रिक्षा चालक त्यांची ओळख सांगताना दिसत आहेत. शिवाय, ते रवीनाच्या असंख्य चाहत्यांपैकी आपणही एक असल्याचं सांगत आहेत. 

वाचा : शाहरुखच्या 'स्वदेस'मध्ये झळकलेली अभिनेत्री आज एक 'बिझनेस वुमन'

तिच्या विविध चित्रपटांची नावं घेत, रवीनाचे चित्रपट आपण पाहिल्याचंही त्यांनी आनंदाने सांगिलं. शिवाय पुन्हा भेट होईलच या आशेवर त्यांनी रवीनाचा निरोप घेतला. दैनंदिन जीवनात आपण अनेक व्यक्तींना भेटतो. ज्यामध्ये ओळखीचे आणि अनोळखी असे कैकजण असतात. पण, काही व्यक्ती कल्पना नसताना आपल्यासमोर येतात आणि ते त्या क्षणी अतीशय महत्त्वाचे होऊन जातात. अशा व्यक्तींचा विसर पडणं कठीणच. रवीनासाठी हे रिक्षावाले 'चाचा' तसेच एक व्यक्ती.