Hathras gang rape : त्या नराधमांना सर्व लोकांसमोर गोळ्या घाला; संतप्त कंगनाची मागणी

मागील दोन आठवड्यांपासून या तरुणीवर उपचार सुरु होते, पण.... 

Updated: Sep 29, 2020, 05:21 PM IST
Hathras gang rape : त्या नराधमांना सर्व लोकांसमोर गोळ्या घाला; संतप्त कंगनाची मागणी  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : उत्तर प्रदेशातील हाथरस येथील सामुहिक बलात्कार पीडिता दलित तरुणीचा मंगळवारी मृत्यू झाला. उपचारादरम्यान या १९ वर्षीय तरुणीनं अखेरचा श्वास घेतला. मागील दोन आठवड्यांपासून या तरुणीवर उपचार सुरु होते. तिच्यावर झालेल्या अमानुष अत्याचारांनं साऱा देश हळहळला. याच अत्याचारांशी झुंज देत असताना तिची प्राणज्योत मालवली आणि बलात्कार करणाऱ्या चारही नराधमांना शिक्षा व्हावी अशी मागणी साऱ्या देशातून करण्यात आली. 

अभिनेत्री कंगना राणौत हिनंही सोशल मीडियाचा आधार घेत सदर घटनेबाबत संताप व्यक्त केला. बलात्कार करणाऱ्या नराधमांना जनमानसांत आणूनच त्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत अशी मागणीच संतप्त कंगनानं केली. आपल्या देशासाठी हा अत्यंत लाजिरवाणा दिवस असल्याचं म्हणत महिलांवर होणाऱ्या अत्याचारांनी बी- टाऊनची क्वीनही हळहळली. 

'या नराधमांना जनमानसात आणून गोळ्या घाला. दरवर्षी बलात्कारांच्या घटनांच्या या वाढत्या आकड्यांवर तोडगा काय? आज या देशासाठी आणि आपणा सर्वांसाठीत अत्यंत निराशाजनक आणि लाजिरवाणा दिवस आहे', असं लिहित आपणच कुठंतरी अपयशी ठरल्याची भावना तिनं या पोस्टमधून व्यक्त केली. 

एएनआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार हाथरस येते बलात्कार झालेल्या या तरुणीला १४ सप्टेंबर २०२० ला उपचारांसाठी दिल्लीतील सफदरगंज येथे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जेथे मंगळवारी तिनं या जगाचा निरोप घेतला. 

 

आयएएनएसच्या वृत्तानुसार जनावरांसाठी चारा आणण्यास गेली असता या तरुणीला गळ्याभोवती ओढणी गुंडाळून तिला ओढण्यात आलं होतं. ज्यामुळं तिच्या पाठीच्या कण्याला जबर दुखापत झाली होती. अतिशय अमानुपणे तिच्यावर अत्याचार करण्यात आले होते. संपूर्ण देशातून सध्या या प्रकरणी संतापाची लाट उसळली आहे.