मुंबई: #MeToo चं वारं आता संपूर्ण कलाविश्वात परसलं असून, त्याला दर दिवसागणिक वेगळी दिशा मिळत आहे. आतापर्यंत प्रसिद्ध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, लेखक यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले असून, त्यांचा खरा चेहरा सर्वांसमोर आला आहे.
बरीच वर्षे या महत्त्वाच्या मुद्दयावर मौन पाळल्यानंतर आता महिला वर्ग अक्षरश: पेटून उठला आहे.
नाना पाटेकर, आलोकनाथ यांच्याविषयी अशा काही गोष्टी समोर आल्या आहेत की या कलाकारांकडे पाहण्याचा दृष्टीकोनही बदलला आहे.
अशा या गर्दीत बी- टाऊनची क्वीन, अभिनेत्री कंगना रणौत हिनेही आपलं मत मांडल्याचं पाहायला मिळालं. सध्या याच प्रकरणी कंगनाचं नाव पुन्हा चर्चेत आलं आहे.
यावेळी तिने कलाविश्वातील काही बड्या प्रस्थांसमोर एक प्रश्न उपस्थित केला आहे.
#MeToo या चळवळीविषयी मी जवळपास दर दिवशी बोलत आहे. पण, आता मात्र या मुद्दयावर अनेकांच्या संख्येने खुलेपणाने बोलण्याची गरज आहे. फक्त एकानेच याविषयी प्रतिक्रिया देऊन काही होणार नाही, असं मत तिने बॉलिवूड लाईफशी बोलताना मांडलं.
'करण जोहर, शबाना आझमी यांसारख्या सेलिब्रिटींनीही याविषयी त्यांचं मौन सोडावं. करण नेहमीच त्याचा एअरपोर्ट लूक, जीम लूक या साऱ्याविषयी बोलत असतो, मग या प्रकरणी काय झालं?, असा प्रश्न तिने उपस्थित केला.
ज्या कलाविश्वाने त्यांना प्रसिद्धी दिली, उपजिविकेचं साधन दिलं त्या कलाविश्वात आज इतकं काही घडत असताना ही मंडळी आहेत तरी कुठे, असा प्रश्न मांडत तिने खंत व्यक्त केली.
कंगनाने उपस्थित केलेल्या या प्रश्नांनंतर आता तरी करण जोहर आणि चित्रपट सृष्टीतील इतर मंडळी लैंगिक शोषणाच्या या मुद्द्यावर आपली मतं मांडणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.